शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात; छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत.

शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात; छगन भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका

आगामी लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. या निवडणुकींच्या पार्श्ववभूमीवर महायुतीतील जागावाटपाच्या चर्चेना वेग आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला कोणत्या जागा मिळणार यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत अमित शाह (Amit Shah) यांची मुंबईमध्ये चर्चा झाली. त्यातच आता अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जेवढ्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला असणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादीला हव्यात, असे छगन भुजबळ म्हणाले.

दोन दिवस आमच्यामध्ये बैठक घेण्यात आली. त्यावेळी मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे हे देखील या बैठकीला उपस्थित होते. जितक्या जागा शिवसेनेला दिल्या आहेत तितक्याच जागा आम्हाला देखील हव्या आहेत. आमचे वरिष्ठ यावर प्रयत्न करतील, असे छगन भुजबळ म्हणाले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बारामती, रायगड, शिरूर, सातारा, परभणी, गडचिरोली, धारशिव, दिंडोरी किंवा नाशिक, बुलढाणा या जागांवर अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये दावा सांगणार आहे. त्यामुळे आता अंतिम बैठकीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महायुतीच्या जागावाटपाचा अंतीम निर्णय आजच होण्याची शक्यता आहे.

काल आणि आज या दोन दिवसांत १५ ते १६ लोकसभा मतदारसंघातील स्थानिक कार्यकर्ते यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी कालपासून आमच्या बैठका सुरु होत्या. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे सर्व राष्ट्रवादीचे मंत्री या बैठकीला उपस्थित होतो. कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांच्या भूमिका समजून घेतल्या आहेत. दरम्यान, या क्षणाला देखील आमच्या जागावाटपाची चर्चा सगळीकडे सुरु आहे. त्याची पूर्वीतयारी म्हणून आमचा अभ्यास सुरु होता. तसेच पुन्हा एकदा सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्याचे काम आम्ही केले आहे. तसेच जागावाटपाचा अंतिम निर्णय झाल्यावर आम्ही आणखी जोमाने काम करायला सुरुवात करणार, असे छगन भुजबळ म्हणाले.

Exit mobile version