प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला… Jitendra Awhad यांची आक्रमक भूमिका

प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला… Jitendra Awhad यांची आक्रमक भूमिका

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरु आहे. महाराष्ट्र
दौऱ्याच्या निमित्ताने एका सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा भटकंती आत्मा असा उल्लेख केला. त्यांनी केलेल्या या टीकेमुळे राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राजकीय विश्वातील अनेक नेत्यांनी त्यावर भाष्य केले. शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ही कोणा एका पुढाऱ्यावर टीका नाही तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दमणाऱ्या प्रत्येक बापाची थट्टा असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड? 

सत्तरी पार केलेला, ८०-८५ वर्षाचा पार नव्वदीच्या पुढे गेलेले आपले वडील काठीच्या आधाराने हळूहळू गुडघे सांभाळत दारातून बाहेर पडत बांधावर उभे राहत आडवा हात डोळ्यावर धरत वावरातील पिकाकडे बघत राहतात आणि चारही बाजूने फिरत आकाशाकडे भिरभिरत्या नजरने बघत हळूच वरचा ओठ खालच्या ओठावरून फिरवत घशात आलेला कोरडेपणा डोळ्यातील आसवाने ओला करत पंढरीच्या दिशेने हात जोडत मनातल्या मनात काही तरी म्हणतो. आपल्या मागे या पोरांच्या शिवाय आपल्या वावराचे काय होणार याची त्याला काळजी वाटते.

आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दमणाऱ्या प्रत्येक बापाची थट्टा आहे

आपण त्याच्या जीवावर लै खंबीर आहोत आपल्या पायात, मांड्यात आणि दंडात जाम रग आली आहे मात्र बापाचा जीव असतो लेकावर आणि त्या मायेने तो उन्हात फिरतो त्याला माया म्हणतात आणि असच छोटा किराणा दुकानदार करतो, असच कापड दुकानदार करतो. अगदी शहरातील मध्यमवर्गीय बाप हुशार, अभ्यासू आणि मेहनती पोराचं अभ्यासाचं टेबल आवरून ठेवणे असो, असच प्रत्येक बाप त्याच्या पोरासाठी मायेतून करतो. अशा बापाला भटकती आत्मा म्हणावे? ही कोणा एका पुढाऱ्यावर टीका नाही तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी दमणाऱ्या प्रत्येक बापाची थट्टा आहे – प्रत्येक बापाचा अपमान आहे – आपल्याच लग्नात येवून आपल्या बापाचे मुंडासे उधळून लावायचे आणि फक्त बाप नाही तर बापाच्या नावाचा, आडनावाचा, वाडी, वस्ती , गाव, रान, वावर, जात, धर्म, नाते आणि नात्यातून येणाऱ्या जबाबदारीचा अपमान आहे. बापावर जीव असणाऱ्या प्रत्येक पोराने आणि स्वतःच्या पोरांच्या भविष्यासाठी दमणाऱ्या प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला उत्तर द्यायची वेळ आली आहे.

जेव्हा मी पंतप्रधानांना भेटेन, त्यावेळी त्यांना विचारेन 

याबाबत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी भटकती आत्मा कोणाला म्हणाले हे माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, जेव्हा मी पंतप्रधानांना भेटेन, त्यावेळी मंचावर त्यांना याबाबत नक्की विचारेन, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हे ही वाचा:

मुस्लिम समाजासाठी नसीम खान प्रचंड आक्रमक; कॉंग्रेसमध्ये दलाल घुसल्याचा आरोप

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ! कांदा निर्यातबंदी हटवण्याचा घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version