रामलल्लांवर होणार सूर्यकिरणांचा अभिषेक, भाळी लागणार सूर्यतिलकाची मोहोर

रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता, ४ मिनिटांपर्यंत हा अभिषेक होणार असून भक्तांची एकच नजर याकडे लागून आहे.

रामलल्लांवर होणार सूर्यकिरणांचा अभिषेक, भाळी लागणार सूर्यतिलकाची मोहोर

५०० वर्षांच्या आतुरतेने रामलल्लाचे आगमन जानेवारीमध्ये अयोध्येत झाले. त्यानंतर भक्तांचा एकच उत्साह दिसून येत आहे. सर्व भक्त रामनवमीची आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाची रामनवमी ही अविस्मरणीय असेल, कारण रामलल्लाच्या माथ्यावरती सूर्यतिलक म्हणजेच सूर्यकिरणांचा अभिषेक होणार आहे. हा अभिषेक घडवून आणण्यासाठी गेले बरेच दिवस रुडकीच्या सेंट्रल बिल्डिंग रिसर्च संस्थेचे वैज्ञानिक दिवसरात्र मेहनत घेत होते. रामनवमीच्या दिवशी दुपारी १२ वाजता, ४ मिनिटांपर्यंत हा अभिषेक होणार असून भक्तांची एकच नजर याकडे लागून आहे. रामलल्लांच्या कपाळी होणारा हा गोलाकार सुर्याभिषेक ७५ एमएम व्यासाचा असणार आहे. पंतप्रधान मोदींनी मंदिर बांधताना सुर्याभिषेकाची इच्छा व्यक्त केली होती, म्हणून मंदिराचे बांधकाम करताना त्याची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली आहे.

आपल्याला कोल्हापूरच्या अंबाबाईचा किरणोत्सव माहीतच आहे. मंदिराच्या पश्चिम दरवाजातून मावळतीची किरणं अंबाबाईला अभिषेक करतात.  ही किरणं मंदिराच्या पश्चिम दरवाजातून येत देवीच्या पायापासून मस्तकापर्यंत अभिषेक करतात. असाच काहीसा अनुभव राम भक्तांना घेता येणार आहे. पण दोन्ही अभिषेक एकमेकांपासून वेगळे आहेत. अंबाबाईच्या अभिषेकाची किरणे दरवाजातून येतात, पण रामलल्लासाठी येणारी अभिषेकाची किरणे ही घुमटातून येणार आहेत. भगवान रामाचा जन्म मध्यान्नवेळी झाला होता. यावेळी सूर्य माथ्यावरती असतो. यामुळे मंदिरात राम भगवान विराजमान असलेल्या ठिकाणी घुमटाची गवाक्षासारखी रचना केलेली आहे. यातूनच विशिष्ट सिस्टिमच्या साहाय्याने किरणे गवाक्षामधून आत येतील आणि रामलल्लांवर अभिषेक करतील.

घुमटाच्या गवाक्षामध्ये ऑप्टोमेकॅनिकल सिस्टिमचा वापर केला आहे, ज्यामुळे किरणांची दिशा अचूक राहील. यामध्ये दोन आरसे एक पितळेचा पाईप आणि तीन लेन्सेसचा वापर केलेला आहे, जेणेकरून रामनवमीच्या दिवशी छतावर किरणे पडल्यानंतर ती रिफ्लेक्ट होऊन रामांच्या मस्तकी अभिषेक करतील. गाभाऱ्यात रामलल्लासमोर ६० अंशामध्ये आरसा बसवला गेला आहे, जो रिफ्लेक्शनचे काम करणार आहे. रामलल्लांवर होणाऱ्या या अभिषेकाचे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी भक्तांसाठी जवळजवळ १०० एलईडी स्क्रीन्स बसवण्यात येणार आहेत. सुमारे १० ते १५ लाख भाविक दर्शनास येतील असा अंदाज लावण्यात आला असून संपूर्ण मंदिरात पुष्पगुच्छांनी आकर्षक सजावट केली जाणार आहे. यंदाची रामनवमी विशेष असणार आहे यात काही शंकाच नाही.

हे ही वाचा:

रोज सकाळच्या पत्रकार परिषदेला एवढं गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, Uday Samant उदय सामंत यांचा Sanjay Raut यांना टोला !
 
CM Eknath Shinde आज कोल्हापूर दौऱ्यावर, मतदारसंघातील परिस्थितीवर काय बोलणार?
Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version