‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. अमीन सयानी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. अमीन सयानी यांच्या रसाळ शैलीतल्या निवेदनांमुळे श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात. त्यांच्या जादुई आवाजाने मागील काही पिढ्यांपासून टाकलेली भुरळ अगदी आत्ताच्या पिढीपर्यंत देखील टिकून होती. अमीन सयानी हे त्यांच्या आवाजाने करोडो कुटुंबातले सदस्यच झाले होते. त्यांच्या जाण्याने आपला माणूस हरपल्याची सगळ्यांची भावना आहे असे म्हणत अमीन सयानी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा अमीन सयानी यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले. रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनानं भारतीय रेडिओच्या सांगितिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडीओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते, त्या काळात अमिन सयानींनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडीओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनानं रेडीओवरील गीतांची गोडी कैकपटीनं वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडीओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडीओवर असणं आणि त्यांचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. अमीन सयानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण! अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

ज्येष्ठ रेडिओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली. त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत. त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असेलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबीयांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

हे ही वाचा:

सरकारकडून देण्यात आलेल्या निर्णयावर मनोज जरांगे यांनी दिली प्रतिक्रिया

Exclusive : ‘स्ट्रॉबेरी विथ सीएम’ कार्यक्रमात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version