Tuesday, May 21, 2024

Latest Posts

Mumbai Monsoon Update : मुंबईत १४ जुलै पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी

पावसाचा जोर वाढल्याने पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबई : आजपासून मुंबईत ठीक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे 13 – 14 जुलै पर्यंत मुंबईत पावसाची संततधार कायम असल्याची माहिती मिळतेय. काल दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. त्याचप्रमाणे आज ही सकाळपासून मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात गेल्या दीड तासापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
हवामान खात्याने खबरदारी म्हणून मुंबईकरांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याच्या सूचना ही दिल्या आहेत. कारण जोरदार पावसासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबईत येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला असून १४ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आजही आठ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. नाशिकमध्ये ही धो धो पाऊस सुरू असल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Latest Posts

Don't Miss