Thursday, May 16, 2024

Latest Posts

डॉ. भूषण गगराणी यांनी स्वीकारला बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आयुक्त पदाचा कार्यभार आज (दिनांक २० मार्च २०२४) सायंकाळी स्वीकारला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी आयुक्त पदाचा कार्यभार आज (दिनांक २० मार्च २०२४) सायंकाळी स्वीकारला. आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजित बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (सामान्य प्रशासन) श्री. मिलिन सावंत, सह आयुक्त (विशेष) श्री. रमेश पवार, सह आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. चंद्रशेखर चोरे आदींसह महानगरपालिकेचे विविध वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

डॉ. भूषण गगराणी हे भारतीय प्रशासन सेवेतील सन १९९० च्या तुकडीचे अधिकारी आहेत. संपूर्ण भारतातून तिसऱया क्रमांकाने आणि मराठी भाषा घेवून उत्तीर्ण होणारे ते देशातील पहिलेच सनदी अधिकारी (आयएएस) आहेत. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी (M.Com.) तसेच इतिहास या विषयातही कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. History) त्यांनी संपादीत केली आहे.

यासह डॉ. गगराणी यांनी नागपूर विद्यापीठातून विधी शाखेची (LLB) पदवीही संपादन केली आहे. तर लंडन येथील बर्मिंगहॅम विद्यापीठातून प्रशासन या विषयातून त्यांनी व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदवी (MBA) संपादन केली आहे. यासह मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापन या विषयात त्यांनी विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवी मिळविली आहे. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर डॉ. गगराणी यांनी सुरुवातीची दोन वर्षे भूमी महसूल व्यवस्थापन आणि जिल्हा प्रशासन, विकास प्रशासन या संदर्भातील कामकाज पाहिले.

छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे येथे युवक कल्याण आणि क्रीडा विभागाचे संचालक, सिंधुदुर्ग येथे जिल्हाधिकारी म्हणून कामकाम पाहिले. त्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयात उप सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाचे (सिडको) व्यवस्थापकीय संचालक अशा निरनिराळ्या पदांची धुरा सांभाळताना त्यांनी आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविला.

त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव आणि नगर विकास विभागात प्रधान सचिव म्हणून देखील त्यांची नियुक्ती करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेत नियुक्त होण्यापूर्वी डॉ. भूषण गगराणी मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव या पदावर कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे नगरविकास, जलसंपदा आणि मराठी भाषा या विभागांची देखील जबाबदारी होती.

हे ही वाचा:

सिंदखेडराजामधील सभेत उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका; गद्दारीला मते देऊ….

निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता का लागू होते? Elections । Lok Sabha

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss