Friday, April 19, 2024

Latest Posts

स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीनमहाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा – राज्यपाल

सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्यपाल रमेश बैस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित समारंभात दिली. स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा, असे आवाहन करून त्यांनी नागरिकांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 
 
७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त (REPUBLIC DAY) मुंबईतील  शिवाजी पार्कवर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल बैस यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना तसेच समाजसुधारकांना अभिवादन करून राज्यपाल बैस यांनी महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात करीत असलेल्या विकासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशातील सर्वाधिक लांबीच्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’ या सागरी पुलासह ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तीन लाख ५३ हजार ६७५ कोटींहून अधिक रुपयांचे विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.
 
मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली असल्याचे राज्यपाल बैस यांनी सांगितले. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात मे २०२३ मध्ये उपचारात्मक याचिका (CURATIVE PETITION) दाखल केली असून शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE), संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तिन्ही सेना दलांचे वरिष्ठ अधिकारी, विविध देशांच्या वकिलातीमधील वरिष्ठ पदाधिकारी आदी उपस्थित होते.
 

Latest Posts

Don't Miss