Friday, May 17, 2024

Latest Posts

Selfie Point व सह्यांच्या मोहिमेसह रंगला मतदारांचा महाराष्ट्र दिन

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याचा मुख्य समारंभ हा दादर पश्चिम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे  आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य समारंभ पार दादर येथे पडला. यावेळी ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सेल्फी पॉईंट, सह्यांची मोहीम यासह प्रत्यक्ष संवादावर भर देऊन मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला, अशी माहिती ‘स्वीप’च्या मुख्य समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी दिली.

मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृतीविषयक विविध उपक्रम सुरू आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून मतदार जनजागृतीविषयक संदेशांसह सेल्फी पॉईंट उभारण्यात आले होते. त्याचबरोबर येत्या २० मे २०२४ रोजी “मी अवश्य मतदान करणारच” या संदेशासह सह्यांसाठीचे फलक देखील उभारण्यात आले होते. या दोन्ही उपक्रमांना उपस्थित मान्यवरांनी व परिसरातील नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त या समारंभप्रसंगी विविध क्षेत्रातील कामगार देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत अवश्य मतदान करण्याचे वचन घेऊन आम्ही मतदान करणारच, असा संकल्प त्यांनी यावेळी केला. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशनवर काम करणारे हमाल बांधव, अंगणवाडी सेविका, कम्युनिटी हेल्थ वर्कर, परिचारिका, होमगार्ड, पोलीस, मुंबई अग्निशमन दल, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.), राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.), बांधकाम कामगार, नाका कामगार व घरेलू कामगार यासारख्या विविध क्षेत्रातील कामगारांचा यामध्ये समावेश होता. प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित असणाऱ्या या कामगारांनी कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना व परिसरातील नागरिकांना येत्या २० मे २०२४ रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले, अशी माहिती मुकादम यांनी दिली.

 

यावेळी मुख्य सचिव नितीन करीर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss