Saturday, July 27, 2024

Latest Posts

POLITICS: सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र विधानसभाचे हिवाळी अधिवेशन आज ७ डिसेंबर, २०२३ पासून नागपूर येथे सुरु झाले असून या अधिवेशनात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. यावेळी विरोध पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खडाजंगी पाहायला मिळाली. एका देशद्रोह्याच्या मांडीला-मांडी लावून आम्ही बसू शकत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले होते, असे भाष्य विरोध पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषद अधिवेशनात मांडले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबादास दानवे यांना प्रत्युत्तर दिले आहे. जामिनावर सलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी आज अजित पवार गटात सहभागी होऊन बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्यामुळे भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात आली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहिले आहे. ज्यात नवाब मलिक यांना विरोध दर्शवण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात काय म्हटले आहे? 

प्रति,

श्री. अजितदादा पवार,

उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तथा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

सस्नेह नमस्कार,

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य श्री. नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो.

परंतू, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सद्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतोला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही लोक घटक पक्षाला करावाच लागत असतो. त्यामळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. त्यांना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणा-या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना दिलेल्या या पत्रानुसार आता काय निर्णय घेण्यात येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हे ही वाचा:

नवाब मलिकप्रकरणी सुषमा अंधारेंचा फडणवीसांना खोचक टोला

रोहित पवार यांना लवकर मोठे होण्याची घाई झाली आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss