Monday, May 20, 2024

Latest Posts

राज्य शासनाने माझ्याकडे महत्वपूर्ण शहराची जबाबदारी दिली – Civic Chief Saurabh Rao

ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी सौरभ राव यांच्याकडे ठाणे महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त पदाची सूत्रे सुपूर्द केली. सौरभ राव हे ठाणे महानगरपालिकेचे २२ वे आयुक्त आहेत. ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त तथा प्रशासक सौरभ राव हे भारतीय प्रशासन सेवेच्या २००३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. ठाण्यात रुजू होण्यापूर्वी ते पुणे येथे सहकार आयुक्त या पदावर कार्यरत होते. राव हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून त्यांनी लखनऊ विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे राज्य सेवेत तसेच भारतीय पोलीस सेवेत अधिकारी म्हणून काम केले. २००३ मध्ये राव भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. २००४ मध्ये वर्धा जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी या पदावरून प्रशासकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर, गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नंदूरबारचे जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त आणि नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला. पुणे येथे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, साखर आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ठाण्यात येण्यापूर्वी ते सहकार आयुक्त म्हणून कार्यरत होते.

राज्य शासनाने माझ्याकडे महत्वपूर्ण अशी ठाणे शहराची जबाबदारी दिली आहे. आतापर्यंतचा माझा जो प्रशासकीय अनुभव आहे, त्या अनुभवाच्या आधारावर या शहराचा अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त, राहण्यासाठी उत्तम शहर अशा पध्दतीने विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे करताना नागरिकांची दैनंदिन जीवनशैली, अडीअडचणी म्हणजेच वाहतुकीचा विषय, पाण्याचा प्रश्न, ड्रेनेज, अतिक्रमण या विषयावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करणार आहे. पुढील २५ वर्षांत शहराचा विकास करण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्याचा एक कृती आराखडा तयार करण्यात येईल. त्यात तातडीचे, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन महत्त्तवाचे विषय निश्चित केले जातील, असेही आयुक्त राव यांनी सांगितले. पर्यावरपूरक आणि कार्बन न्यूट्रल शहर करण्यासाठी नागरिकांचा विशेषत: युवा पिढीचा सहभाग घेतला जाईल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. प्रभावी लोकप्रतिनिधी, सकारात्मक माध्यमे आणि जागरूक नागरिक या तिघांच्या पाठबळाने ठाणे महानगरपालिका यशस्वी मार्गक्रमण करेल, असा विश्वासही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.

ठाणे हे अतिशय महत्त्वाचे शहर आहे. झपाट्याने होणारा विकास आणि वाढती लोकसंख्या यांचा विचार करून हे शहर राहण्यासाठीचे सर्वोत्तम शहर असावे, असा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ठाणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे उपस्थित होते.

हे ही वाचा:

मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चव घेऊ शकते;पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वसंत मोरे इच्छुक

सरकारमध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत; मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss