Sunday, May 19, 2024

Latest Posts

कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू

कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी (Shiv Sena Mla Disqualification case ) नागपूर विधीमंडळ अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू झाली आहे. आजपासून शिवसेना ठाकरे गटाचे वकील अॅड. देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू झाली आहे. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलटतपासणी झाल्यानंतर आजपासून शिंदे गटाच्या आमदारांची उलटतपासणी होईल. शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या सुनावणीतील महत्त्वाचे मुद्दे :

>> शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी :
अॅड देवदत्त कामत : आपण एक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. तर हे प्रतिज्ञापत्र एकनाथ शिंदे यांच्या वतीने दिले केले आहे की आपल्या तर्फे केले आहे?

दिलीप लांडे : माझी जी वस्तुस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

देवदत्त कामत : आपण पिटीशन क्रमांक 1 ते 16 मध्ये जी साक्ष दिली ती आपण एकनाथ शिंदे यांच्या वतीने देत आहात की स्वतः देत आहात

दिलीप लांडे : याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये माझे नाव नाही असे आपण मला सांगितले..पण जी सत्य परिस्थिती लोकांसमोर आणि न्यायालयासमोर यावी यासाठी ही साक्ष मी देत आहेत.. ही साक्ष मी एकनाथ शिंदे यांच्यावतीने नाही तर स्वतःच्या वतीने देत आहे.

देवदत्त कामत : आपण याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये पक्षकार नाही आहात..आपण पक्षकार नसताना तुम्ही साक्ष देत आहात म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने तुम्ही साक्ष देत आहात का?

दिलीप लांडे : परिस्थिती अशी आहे की, याचिका क्रमांक 1 ते 16 मध्ये नाव आहे किंवा नाही हे आपण मला सांगितले..त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे हे आपल्या समोर आणि जनतेसमोर यावे म्हणून मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.

देवदत्त कामत : आपण एकनाथ शिंदेंच्या वतीने साक्ष देत नाहीत, आपल्याला याबाबत काय म्हणायचे आहे? हे खरे आहे की खोटे?

दिलीप लांडे : मी एकनाथ शिंदे यांच्या सपोर्टमध्ये साक्ष देत आहे. याचा अर्थ मी त्यांच्या वतीने देत आहे.

देवदत्त कामत : आपण शिवसेना या राजकीय पक्षाचे केव्हा पासून सदस्य आहात

दिलीप लांडे : मुंबईत आल्यापासून म्हणजेच 1984-85 पासून

देवदत्त कामत : आपल्या प्रतिज्ञापत्रातील परिच्छेद 11मध्ये तुम्ही म्हटले आहे की “तुम्ही पक्षाच्या सदस्यत्व सोडून देईल अशी कुठलीही कृती केलेली नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने चालत आहे. माझ्या पक्षाने निर्देश दिले त्यांच्या विरोधात काम केले नाही. पण तुम्ही पक्षाच्या विचारधारेनुसार काम करत असाल तर 2005 मध्ये बाळासाहेब जिवंत असताना तुम्ही पक्ष का सोडला?

दिलीप लांडे : मी आपल्यासमोर जी साक्ष दिली आहे, ती आताच्या वस्तुस्थितीवर दिली आहे. मी साक्षीमध्ये पूर्वीची वस्तुस्थिती मांडलेली नाही. त्यामुळे आता जी वस्तुस्थिती आहे, आता मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आणि बाळासाहेबांनी जी शिकवण दिलेली आहे ती शिकवण आचरणात आणण्यासाठी त्या परिच्छेदात ते उत्तर दिले आहे.

देवदत्त कामत : बाळासाहेब ठाकरे हयात असताना तुम्ही शिवसेना राजकीय पक्ष सोडला होता अणि तुम्ही मनसे पक्षात प्रवेश केला. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?

(शिंदे गटाच्या वकिलांचा आक्षेप या प्रश्नाला काहीही आधार नाही)

दिलीप लांडे : मला यावर काहीही बोलायचे नाही.

देवदत्त कामत : तुम्ही योग्य उत्तर देत नाही.

शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक खडाजंगी

ठाकरे गटाच्या वकिलांचा आक्षेप साक्षीदार योग्य उत्तर देत नाही

शिंदे गटाकडून मात्र नकार. ते उत्तर देत असल्याचे वक्तव्य…

देवदत्त कामत : या आधीच्या प्रश्नात मी सुचवले ते खरे होते, म्हणून तुम्ही उत्तर टाळत आहात का?

दिलीप लांडे : मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली आहे. माझे दैवत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत, माझ्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे मी त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही.

देवदत्त कामत : बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध असलेल्या राजकीय पक्षांच्या विरुद्ध शिवसेनेने निवडणूक लढवल्या. बाळासाहेबांच्या शिकवणी विरोधात असलेल्या या पक्षांसोबत युती करणे मान्य आहे का?

दिलीप लांडे : योग्य नाही. आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी या विचारांशी सुसंगत राहूनच आदरणीय ठाकरे कुटुंबियांच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढवली. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस किंवा हिंदुत्त्वाच्या विरोधात ज्यांचे विचार आहेत अशा कोणत्याही पक्षाच्या माध्यमातून मी निवडणूक लढविलेली नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची शिकवण आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी निवडणूक लढविलेली आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार आजपर्यंत आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

देवदत्त कामत : शिवसेना राजकीय पक्षाने सध्या राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करणे हे योग्य आहे का?

दिलीप लांडे : आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी…..

विधानसभा अध्यक्ष : आपण फक्त शिवसेनेने राष्ट्रवादी सोबत सत्तेत राहणे योग्य की अयोग्य हे सांगा.

दिलीप लांडे : माझे मत मला मांडू द्या

अध्यक्ष : तुम्ही नीट मांडा, नाहीतर मला ते मराठीतून इंग्रजीत भाषांतर करताना भिरभिरतंय

सभागृहात हसू उमटले

दिलीप लांडे : आदरणीय हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी अणि हिंदुस्थान देशामध्ये हिंदुत्त्वाच्या रक्षणासाठी शिवसेना भाजपाची युती केली होती आणि अनेक वर्षे या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्त्वाचे सरकार आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर सरकार होते. ज्या हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाचे विचार आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार हिंदुस्थान मधील राजकीय पक्षाला मान्य होते, अशा हिंदुत्ववादी लोकांबरोबर देशाची सेवा करणे हे योग्य आहे.

देवदत्त कामत : शिवसेना आणि बाळासाहेब यांची विचारधारा राष्ट्रवादी सोबत युती करण्याची परवानगी देते का?

दिलीप लांडे : या प्रश्नाचे उत्तर मी आता दिले आहे.

कामत : राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेच्या विचारधारेला विरोध आआहे अस म्हटले तर ते योग्य राहील का?

लांडे : मला सविस्तर उत्तर द्यावं लागेल

पुन्हा एकदा सभागृहात हशा.

अध्यक्ष : तुम्ही उत्तर द्या पण तुम्ही आता पर्यंत शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल चार वेळा सांगितले आहे.

लांडे : आता वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना भाजपच्या विचारांशी सहमत होऊन राष्ट्रवादी सहभागी झाली आहे.

अध्यक्ष : मोजकी उत्तर द्या

पुन्हा एकदा सभागृहात मोठ्याने हशा…

देवदत्त कामत : आपल्याला माझं असं सांगणं आहे की आपण जी साक्ष देत आहात ती खोटी आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मानत नसुन तुम्ही सोयीची विचारधारा करता.

दिलीप लांडे : मी साक्ष देत आहे ती खरी आहे. मी बाळासाहेब यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे.

देवदत्त कामत : आमदारांचा एखादा गट विरोधीपक्ष असणाऱ्या राजकीय पक्षाशी युती करू शकत नाही.. यावर आपलं काय मत आहे

दिलीप लांडे : ज्यांच्यासोबत आपण निवडणुक लढवली. अशा हिंदुत्ववादी पक्षासोबत युती करू शकतो.

कामत : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत 30 जून 2022 ला सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे का?

लांडे : होय

देवदत्त कामत : अनुक्रमांक 32 वरील जी सही आहे ती आपली आहे का?

दिलीप लांडे : होय

देवदत्त कामत : सही करण्या अगोदर आपण हे वाचून आणि समजून घेतलं का?

दिलीप लांडे : होय

कामत : आपण या मजकुराशी सहमत होता म्हणून यावर सही केली का

लांडे : होय

कामत : या कागद पत्रात जो ठराव दिलेला आहे त्यानुसार शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो योग्य होत का?

दिलीप लांडे : सदर बैठक विधिमंडळ गटनेता निवडी बाबत होती आणि महाराष्ट्र विधिमंडळ कायद्याप्रमाणे निवडून आलेल्या त्या पक्षाच्या लोक प्रतिनिधींना गटनेता निवडीचा अधिकार असतो. त्यामुळे सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारानी आदरणीय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली होती.

देवदत्त कामत : विधिमंडळ पक्षाचे सदस्य, नेता आणि प्रतोद निवडतात अशी आपली भूमिका आहे का?

दिलीप लांडे : विधीमंडळ पक्षाचा नेता निवडायचे काम निवडून आलेले आमदार करीत असतात. विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाचे नेते ठरवतात प्रतोद कोण ते…

देवदत्त कामत : एकनाथ शिंदे यांची शिवसेना या पक्षाच्या नेते पदी कधी नियुक्त करण्यात आली

दिलीप लांडे : मला आठवत नाही.

देवदत्त कामत – पान क्रमांक 25 ते 28 हे दिलीप लांडे यांना दाखवण्यात यावे.

या कागदपत्रांना शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. या कागदपत्रांची साक्षीदारांना माहिती नाही. त्यामुळे या कागदपत्रांवर प्रश्न विचारण्यात येऊ नये असेही सांगण्यात आले. ठाकरे गटाचे वकिल अॅड. देवदत्त कामत यांनी हरकत घेतली. या कागदपत्रांबाबतचा मुद्दा रेकॉर्ड वर घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. शिंदे गटाच्या वकिलांनी याला संमती दिली. जोपर्यंत आमच्याकडून हा कागदपत्रे तपासली जात नाहीत, तोपर्यंत त्यावर आमच्या। साक्षीदारास प्रश्न विचारण्यात येऊ नये, असेही त्यांनी म्हटले.

अॅड. देवदत्त कामत : या आधीच्या प्रश्नाच्या उत्तरात आपण म्हटले की शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आपल्याला कळाले की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते आहेत. मग आपण शिवसेनेत प्रवेश कधी केला?

दिलीप लांडे : फेब्रुवारी किंवा मार्च 2018 नंतर

देवदत्त कामत : तुम्ही शिवसेनेत फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये आलात तेव्हा शिवसेनेत इतर नेते कोण होते? हे आपल्याला माहिती होते का?

दिलीप लांडे : शिवसेना नेते एकूण 9 नेते होते. सर्वांची नावे तोंडपाठ नाहीत, मला आठवत नाहीत.

शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या उलटतपासणीस सुरुवात

देवदत्त कामत : आपण ज्या 9 नेत्यांचा उल्लेख केला होता.. कॉलम चारमध्ये ज्या नेत्यांची नावे आहेत ती याच 9 नेत्यांची नावे आहेत का?

दिलीप लांडे : नाही

देवदत्त कामत : त्या 9 नेत्यापैकी आपल्याला कोणत्या नेत्यांची नावे आठवतात

दिलीप लांडे : मला आठवत नाही

देवदत्त कामत : शिवसेना पक्षाचे 2019 मध्ये जेव्हा आपण निवडणूक लढवली तेव्हा शिवसेनेचे अध्यक्ष कोण होते?

दिलीप लांडे : उद्धव ठाकरे

देवदत्त कामत : हे योग्य आहे का की उद्धव ठाकरे तुमच्या कार्यालयात आले होते. जेव्हा 2019 मधील तुमच्या निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. तुम्हाला आशीर्वाद आणि समर्थन देण्यासाठी

दिलीप लांडे : माझ्या काजूपाडा कार्यालयात आले नव्हते किंवा माझ्या मध्यवर्ती कार्यालयात आले नव्हते.

देवदत्त कामत : तुमच्या निवडणूक कार्यालयात आले का?

दिलीप लांडे : माझ्या पहिल्या उत्तरात मी सांगितले आहे.

देवदत्त कामत : मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी तुमच्या संघर्ष नगर कार्यालयाला भेट दिली होती.

दिलिप लांडे : बराच काळ झाला त्यामुळे आठवत नाही.

देवदत्त कामत : दिलिप लांडे यांच्या प्रतिज्ञापत्रात पॅरा 1 मध्ये म्हटलं आहे की, “मी 14व्या विधानसभेच्या कालावधीतला शिवसेना विधिमंडळ पक्षाचा सदस्य आहे.” शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठक घेण्याचे नियम किंवा कोणती पद्धत आहे का?

दिलीप लांडे : मी नवीन असल्याने मला फार कल्पना नाही.

देवदत्त कामत : शिवसेना विधिमंडळ पक्षाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेली आहे का?

दिलीप लांडे : माहिती नाही.

देवदत्त कामत : विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांना वेळ, तारीख सर्व कळवण्याची आवश्यकता आहे का?

दिलीप लांडे : पक्षाचे गटनेते किंवा पक्षाचे प्रमुख विधिमंडळ बैठकीचा दिनांक किंवा वेळ लेखी कळवतात.

कामत : आपण जी कागद पत्र आहेत ती सह पत्र आहेत..त्या मूळ कागद पत्राच्या प्रति आहेत का?

लांडे : मी न्यायालयात सादर केलेले आहेत

कामत : शपथपत्रात आपण असं म्हटलं आहे कि शिवसेनेच्या घटनेशी तुम्ही बांधील आहात म्हणताय ती घटना तीच आहे.

लांडे : सादर केल्याप्रमाणे आहे

देवदत्त कामत : 2019 ते 2022 पर्यत जे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्या शिवसेना पक्षाचे आपण सदस्य होता.

दिलीप लांडे : आजही शिवसेना पक्षाचा सदस्य आहे.

देवदत्त कामत : आपण सादर केलेल्या घटने प्रमाणे , उद्धव ठाकरे हे 20 जून 2022 पर्यंत सर्व आदेश किंवा अधिकार त्यांना होते का ?

दिलीप लांडे : हो

देवदत्त कामत : मविआ युती झाली त्याला आपला विरोध होता असे आपण म्हटलं..मग 2019 ते 22 पर्यंत आपण हा विरोध लेखी आपण कळवला होता का?

दिलीप लांडे : काही सदस्यांनी कळवला होता. मी एकनाथ शिंदे आणि पक्षातील इतर नेत्यांना सुद्धा काँग्रेस सोबत झालेल्या युती संदर्भात विरोध आणि माझे मत प्रदर्शित केले होते.

हे ही वाचा:

हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपटातील लूक प्रदर्शित

DR. AMBEDKAR यांचा महापरिनिर्वाणाच्या आधीचा दिवस कसा होता?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss