ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अशोक सराफ यांनी सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह इतर नेते मंडळींनी अशोक सराफ यांचेसोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून अभिनंदन करताना म्हटले.
आपल्या जिवंत अभिनयाने कित्येक दशके रंगमंचाची सेवा करणारे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि डॉ. अमोल कोल्हे यांनी सुद्धा अभिनेते अशोक सराफ यांचे अभिनंदन केले आहे. आपल्या जिवंत अभिनयाने कित्येक दशके रंगमंचाची सेवा करणारे मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचे आदरणीय “मामा”, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार जाहीर झाला, ही बाब एक कलाकार व सिनेरसिक म्हणून अतिशय आनंदाची आहे. आदरणीय अशोक मामांचे हार्दिक अभिनंदन! यापुढेही त्यांच्या अभिनयाचा आनंद लुटण्याची संधी आम्हाला मिळावी, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना! असे डॉ.अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
“अफलातून” नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने…
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. ही आनंदाची बातमी आहे. आमचं तारुण्य आणि त्याच्या आठवणी चिरतरुण ठेवणाऱ्या या “अफलातून” नायकास हा पुरस्कार देताना या सरकारने कोणतीही “बनवाबनवी” केली नाही, याचा आनंदच आहे. आता मोठ्या “धूमधडाक्यात” त्यांना हा पुरस्कार प्रदान व्हावा, या सदिच्छा..! असे ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांनी अशोक सराफ यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोकमामांना…
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आज जाहीर झाला. मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या वर्षात जन्मलेल्या अशोकमामांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा महाराष्ट्र भूषण जाहीर होतोय, ही अतिशय आनंदाची बाब आहे. मराठी चित्रपट आणि नाटकांचे विश्व त्यांनी गाजविले. सर्व प्रकारच्या भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ यांनी मराठीचा झेंडा हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा फडकवला. त्यांचे मनस्वी अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. अशा शुभेच्छा अशोक सराफ यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
हे ही वाचा:
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा
अंदमानची टूर आणि दुरावा,प्रथमेशला भेटण्यासाठी मुग्धाची लगबग