Friday, May 17, 2024

Latest Posts

आदित्य यांचे निष्ठावंत किरण साळी, रमेश कोंडे मुख्यमंत्र्यांसोबत

मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करायच्या आधीच राज्यभरातून हजारो शिवसैनिकांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायला सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांच्याबरोबर गेलेले ४० आमदार आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शक्ती प्रदर्शनासाठी कंबर कसलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांना सर्वाधिक त्रास देणाऱ्या युवा सेनेच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आता जोर का झटका द्यायला शिंदेंनी सुरुवात केलेली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून पुण्यातील एका ताकदवान युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याला आपल्याकडे खेचले आहे. याच पदाधिकाऱ्याने मातोश्रीवर असंसदीय टीका करणाऱ्या आणि ठाकरे कुटुंबाशी हाडवैर पत्करलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला केला होता.
      गेल्या काही काळात शिवसेनेमध्ये युवा सेनेचा प्रस्थ खूपच वाढलेलं आहे. त्यातही सरचिटणीस वरूण सरदेसाई बोलतील तो प्रमाण शब्द असं समजण्याची रीत सुरू झालेली आहे. याच सरदेसाई यांचे खंदे समर्थक आणि पुण्यातील युवा सेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी असलेले किरण साळी यांनी माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेच्या पायऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जी धक्काबुक्की झाली होती त्या धक्काबुक्कीमुळे किरीट सोमय्या यांच्या डोक्याला गंभीर इजा होण्याची शक्यता होती. त्यानंतर झालेल्या पोलीस तक्रारीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी म्हणून किरण साळी यांचे नाव आहे. ‘मातोश्री’तून गेलेला शब्द आपल्यासाठी शिरसावंद्य मानून काम करणाऱ्या साळी यांचा युवामार्गामध्ये प्रभाव आहे.   युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना अभिप्रेत असलेली अनेक आंदोलने साळी यांनी पुण्यात केली आहेत.
    किरीट सोमय्या हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असताना अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी मूग गिळून गप्प बसणे पसंत केले होते. त्यावेळी किरीट सोमय्या हे पुण्यातील कोविड सेंटर मधील घोटाळ्याचा जाब विचारण्याकरता पुणे महानगरपालिकेतील आयुक्तांच्या भेटीला पोहोचले होते. त्यावेळेला पुणे महापालिकेच्या मुख्यालयात पायऱ्यांवरच सोमैयांना जोरदार धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर पंधरा जणांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यावर फारशी काही विचारपूस ही करण्यात आली नव्हती. त्यामुळे गेले अनेक महिने साळी आणि त्यांचे  पदाधिकारी सहकारी कमालीचे नाराज होते.
     आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे किरण साळी यांचे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  माजीमंत्री उदय सामंत यांच्याशी उत्तम संबंध आहेत.बाणेर क्रीडा संकुलापासून ३० बसेस आणि १०० हून अधिक खाजगी वाहने घेऊन किरण साळी हे सुमारे २००० कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्यासाठी सोमवारी मुंबईला पोहोचले आहेत. सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे सध्या राहत असलेल्या नंदनवन या शासकीय बंगल्यावर साळी आणि त्यांचे सहकारी मुख्यमंत्र्यांना भेटून आपल्या राजकीय कारकीर्दीची नव्याने सुरुवात करतील.
        सेनेचे जिल्हाप्रमुखही साळींसोबत पुण्यातील सेनेचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेशबापू कोंडे हे देखील एकनाथ शिंदे गटामध्ये सहभागी झाले आहेत. रमेश बापू कोंडे यांची पुण्याच्या ग्रामीण भागात दमदार पकड आहे. गेली आठ वर्ष जिल्हाप्रमुख पदावरून काम करताना स्वतःच्या आक्रमक शैलीचा ठसा उमटवणारे रमेश बापू कोंडे यांच्या शिंदे गटात जाण्याने उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून सेनेसाठी धमाकेबाज आंदोलन करणारा एक मावळा आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह दुरावून घेतला आहे.

Latest Posts

Don't Miss