Monday, April 22, 2024

Latest Posts

नैराश्यात असलेल्या मनोज जरांगेंना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत – गुणरत्न सदावर्ते

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभरात दिवसेंदिवस तापत चालला आहे.

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यभरात दिवसेंदिवस तापत चालला आहे. काल आरक्षणाच्या मागणीसाठी राज्य विधिमंडळाने विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. मात्र ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण द्या, त्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी त्यांचे उपोषण सोडले नाही. आज त्यांच्या आंदोलनाचा १२ वा दिवस आहे. त्यातच आता मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनोज जरांगेंवर गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी कडाडून टीका केली आहे. जरांगे कोण आहे? जरांगे हे काय दादा झाले आहेत का? असा प्रश्न गुणरत्न सदावर्ते यांनी विचारला आहे.

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, नैराश्यात असलेल्या मनोज जरांगे यांना शरद पवारांसारखे नेते हवा देऊन फुगवत आहेत. त्यांनी असे करु नये. तसेच मराठा बांधवानी मनोज जरांगे यांच्या नादी लागू नये. काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी बेकायदेशीरपणे वर्तन करून मुंबईमध्ये धुडगूस घालू असे म्हंटले होते. ते मुंबईला वेठीस धरू पाहत आहेत. त्यांना विरोध करणारा मीच आहे. मनोज जरांगे मुंबईमध्ये येत असताना त्यांच्याकडे १४९ ची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर मी दाखल केलेल्या याचिकेनंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगेंची खिल्लीही उडवली होती. राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही आणि सलाईन नाही लागली तर उपोषण नाही, अश्या शब्दांत गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली.

मराठा आंदोलक मनोज जरांगे नैराश्यात आहेत. काही महिन्यांपूर्वी आंतरवली सराटीमध्ये जखमी झालेल्या लोकांची जबाबदारी मनोज जरांगे यांची आहे. तसेच आंतरवलीमध्ये जखमी झालेल्या पोलिसांना राष्ट्रपती पदक द्या, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. मराठा समाजातील सर्व तरुणांनी आरक्षणाची लढाई सोडून द्यावी,आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलं १० टक्के आरक्षण, केंद्राने दिलेले EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षण यामधील लाभातील फरक ओळखा. जे पदरचं आहे ते सोडून द्यायचं. ज्यावेळेस तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभागातील आरक्षणाबद्दल विचारतात त्याचा लाभ घेता, त्यावेळेस दुसऱ्या कोणाचंही आरक्षण देता येणार नाही, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. मंगळवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

 भोपळ्याच्या बिया पुरुषांसाठी ठरतात गुणकारी,जाणुन घ्या फायदे

‘त्यांचं’ निधन ही सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी- Ajit Pawar

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss