Saturday, May 18, 2024

Latest Posts

मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत, ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबत शासन सकारात्मक आहे – CM SHINDE

नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पुण्यातील अखिल भारतीय नाट्यसंमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मराठी रंगभूमीचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल तसेच वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविण्यात येईल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित या कार्यक्रमाला उद्योगमंत्री तसेच नाट्य संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार श्रीरंग बारणे, ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशात नाट्य कलेला २ हजार वर्षांची दीर्घ परंपरा लाभली आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर नाटकाने झाल्यानंतर मराठी रंगभूमीने अनेक बदल पाहिले आहेत. अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाटक रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी आशय, विषय, सादरीकरण, नेपथ्य, संगीत याची चाकोरी मोडण्याची गरज असते, मराठी रंगभूमीने ते केल्याने या रंगभूमीचा उत्कर्ष होत आहे. आज समाजमाध्यमांच्या काळातही प्रेक्षक नाटकांना गर्दी करतात. व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हजारो कलाकार आणि पडद्यामागील कलावंतांनी यासाठी योगदान दिले आहे. गेल्या १०० वर्षात सुवर्णकाळ अनुभवताना अनेक अडचणींवर मात करीत रंगभूमी पुढे जात आहे. म्हणूनच या रंगभूमीचा आनंद सोहळा दिमाखात साजरा होत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सांस्कृतिक कार्य विभागाकडून नवी नाट्यगृहे उभारण्यात येणार आहेत मात्र, हे करतांना नाट्य कलावंतांच्या मागणीनुसार जुन्या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात येईल. मराठी नाट्य परिषदेसाठी मुंबईत भूखंड देण्याबाबत सहकार्य करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नाट्यगृहात पूर्वीप्रमाणे विजेचा खर्च आकारला जाईल. ज्येष्ठ कलावंतांच्या घराबाबतही शासन सकारात्मक आहे. नाट्यसृष्टीच्या उत्कर्षासाठी एकत्रित प्रयत्न करताना मराठी रंगभूमीसाठी शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही पुण्यातील अखिल भारतीय नाट्यसंमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

हे ही वाचा:

रामाचा सर्व हक्क भाजप घेऊ शकत नाही- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

Ram Mandir, श्री रामाला दाखवणार १५१ बनारसी पानांचा नैवेद्य…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss