Healthy And Tasty सोयाबीन थालीपीठ बनवा घरच्या घरी

सोयाबीन हा पदार्थ अनेकांना प्रचंड आवडतो. याशिवाय चविष्ट आणि खुसखुशीत ठाथालीपीने खवय्यांना त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं आहे

Healthy And Tasty सोयाबीन थालीपीठ बनवा घरच्या घरी

सोयाबीन हा पदार्थ अनेकांना प्रचंड आवडतो. याशिवाय चविष्ट आणि खुसखुशीत ठाथालीपीने खवय्यांना त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडलं आहे. थालीपीठ हा अस्सल मराठमोळा पदार्थ आहे. महराष्ट्रात अनेकांच्या घरात नाश्त्याला थालीपीठ हमखास बनवले जातात. खवय्ये हे थालीपीठ दह्यासोबत किंवा पुदिनाच्या चटणी सोबत आवडीने खातात. आपण थालीपीठ हे विविध खाद्य पदर्थां पासून सहज बनवू शकतो. भाज्यांचे किंवा डाळींचे थालीपीठ बनवण्यास अनेकांची पसंती असते.

थालीपीठ बनवताना आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या आवडीचे पदार्थ घालून खरपूस थालीपीठ बनवू शकतो. भाजणीचं किंवा इतर पौष्टिक धान्यांची पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, तीळ, वाटलेलं आलं-लसूण चांगलं मिसळायचं, थोडं थोडं पाणी मिसळत घट्ट मळायचं. त्याचे छोटे गोळे करायचे. तव्यावर तेल टाकून तो गोळा थापायचा. मध्ये छिद्र पाडलं की ते छान भाजलं जातं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. लोणचं, चटणी, सॉस, दही असं काहीही सोबत असलं की कमाल बेत जमतो. चला तर मग जाणून घेऊयात आरोग्यासाठी हेल्दी सोयाबिन चे थालीपीठ घरच्या घरी कसे बनवायचे

साहित्य

सोया चंक्स – १ मोठा बाऊल
बेसन – २ ते ३ टेबलस्पून
मीठ – चवीनुसार
हळद – १ टेबलस्पून
जिरे – १ टेबलस्पून
ओवा – १ टेबलस्पून
आलं – १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)
हिरव्या मिरच्या – १ टेबलस्पून ( बारीक चिरून घेतलेली)
कोथिंबीर – १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेली)
गाजर – १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेले)
कांदा – १ टेबलस्पून (बारीक चिरून घेतलेला)
तेल – २ ते ३ टेबलस्पून
पाणी – १ बाऊल

कृती :-

सर्वप्रथम, सोया चंक्स गरम पाण्यात थोडा वेळ ठेवून फुलवून घ्यावेत. त्यानंतर हे सोया चंक्स हातांनी दाबून त्यातील सगळे पाणी काढून घ्यावेत. पाणी काढून घेतलेले हे सोया चंक्स मिक्सरमध्ये फिरवून त्याचा बारीक भुगा करुन घ्यावा. आता हा सोया चंक्सचा भुगा एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यावा. त्यानंतर त्यात बेसन, मीठ, हळद, जिरे, ओवा, किसून घेतलेलं आलं, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, किसून घेतलेले गाजर, कांदा किंचित पाणी शिंपडून हे थालीपीठाचे पीठ मळून घ्यावे. पॅन मंद आचेवर गरम करुन त्यावर थोडेसे तेल सोडावे, आता हाताला थोडेसे पाणी लावून थालीपिठाचा एक गोळा तयार करुन घ्यावा. या गोळ्याचे थालीपीठ थापून घ्यावे या थापलेल्या थालीपीठाच्या बरोबर मधोमध २ छिद्रे करून घ्यावीत. आता पॅनमध्ये तेल सोडून त्यावर हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.

अश्या प्रकारे घरच्या घरी चविष्ट आणि खरपूस सोयाबीन थालीपीठ तयार आहे. चवदार थालिपीठांचा आस्वाद दही किंवा पुदिना चटणी सोबत घावा.

Exit mobile version