Monday, May 20, 2024

Latest Posts

राजकीय पक्षांनी निवडणूकीच्या नियमांचे पालन करावे, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

मंत्रालय येथे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नोंदणीकृत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत १८ व्या लोकसभा निवडणुक कार्यक्रमाबाबत बैठक घेतली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून आयोगाने निर्देशित  केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन उमेदवार आणि राजकीय पक्षांनी करावे, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी  दिल्या. यावेळी श्री.चोक्कलिंगम यांनी १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील मतदानाचे वेळापत्रक, निवडणुकीसाठी यंत्रणांची तयारी याविषयीची माहिती दिली. त्याचसोबत उमेदवारांसाठीची नियमावली, निवडणूक प्रक्रिया, नामांकन प्रक्रिया, खर्च या विषयीचे नियम आणि प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राजकीय पक्षांनी नियमांचे काटेकोर पालन करत उमेदवारी प्रक्रिया अचूक पार पाडावी, असे आवाहनही एस. चोक्कलिंगम यांनी केले. या बैठकीला विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मतदान प्रक्रियेसाठी मनुष्यबळाचे नियोजन

मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि एव्हीएम युनिटचे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रांवर वीज, पाणी, सावलीसाठी मंडप आदी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक झाल्याचेही जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी आयोजित बैठकीत सांगितले. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेवर देखरेखीसाठी फिरत्या पथकांसह एकूण २२४ पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसभेच्या या निवडणुकीसाठी एकूण दहा निरीक्षक असतील. त्यात सर्वसाधारण, खर्च निरीक्षक आणि कायदा व सुव्यवस्था संदर्भातील देखरेखीसाठी निरीक्षक असतील. मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यासाठी या व्यक्तींना मतदारांना आवाहन करण्यासाठी पत्र देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले. लोकसभेच्या या निवडणुकीसाठी मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम आणि मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात असेल, तर मुंबई उत्तर पूर्वचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विक्रोळी येथे असेल, अशी माहितीही जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी दिली.

Latest Posts

Don't Miss