Saturday, July 27, 2024

Latest Posts

अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता हरपला, Manohar Joshi यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. मध्यरात्री ३ वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मनोहर जोशी यांच्या निधनामुळे राजकीय आणि संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. याबद्दल अनेक राजकीय मंडळींनी सोशल मिडीयाच्यामार्फत त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष श्री मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. माझा त्यांचा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभाध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्त्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 

अत्यंत विश्वासू सहकारी अशी ओळख

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे. स्पष्टोक्ती आणि धडाडीने काम करण्याची वृत्ती या व्यक्तिगुणांनी राजकीय वर्तुळात त्यांची ओळख होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भुषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन राज्याच्या विकासासाठी परिश्रम घेतले. लोकसभेच्या अध्यक्ष पदी असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची प्रमुख भुमिका होती. मी जोशी कुटूंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली…! अशा शब्दांत राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले

मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली. शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले. १९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा भावना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde आणि Narayan Rane यांची बंद दाराआड चर्चा

नाशिकमधील ‘या’ भागांत पाणीपुरवठा असणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss