Tuesday, May 21, 2024

Latest Posts

मी विरोधकांना आवाहन करतो की…महाराष्ट्र दिनी CM SHINDE यांची पोस्ट चर्चेत

१ मे अर्थात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्रक जारी केले आहे. महाराष्ट्रातील माता, बंधू, भगिनी, युवक आणि राज्याचे भविष्य असलेले विद्यार्थी यांना उद्देश्यून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 

तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा… देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी असलेला आपला महाराष्ट्र. कला, साहित्य, संस्कृती, बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रांतील रत्नांची खाण असलेले आपले महान राज्य. त्याचबरोबर हिताच्या आड येणाऱ्यास चौदावे रत्न दाखवणाराही महाराष्ट्रच. बलिदाने इतिहास रंगला, तुझाच पानोपान तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण तू संतांची, मतिमंतांची, बलवंतांची खाण महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महान महाराष्ट्राचे हे यथार्थ वर्णन. स्वार्थाच्या सीमा ओलांडून ज्या भूमीने विश्वाचा विचार केला, त्या महाराष्ट्राला एक राज्य म्हणून मान्यता मिळाली, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा मंगल कलश आणला, तोच हा पवित्र दिवस. या भूमीने देशाला विचार दिला, आदर्श दिले, घटना दिली, संविधान दिले. अशा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो.

मी गेली दोन वर्षे या राज्याची धुरा सांभाळतो आहे

महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीवर संतांच्या विचारांचा पगडा आहे. राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी महाराष्ट्राची महती असली तरी हा कणखरपणा विधायक आहे. हा महाराष्ट्र ज्ञानोबांचा, तुकोबांचा आणि शिवबांचा आहे. सुसंस्कृततेची, शालिनतेची, मानवतेची मंगल गाणी या मातीत घुमली. पसायदानाचा विश्वव्यापी आदर्श विचार या मातीत रुजला. नामदेवांची अमृतवाणी कीर्तनातून येथे ऐकली गेली. एकनाथांचे भारूड येथे गाजले. तुकोबांच्या अभंगवाणीने विश्वाला गवसणी घातली. समर्थांचे मनाचे श्लोक महाराष्ट्राच्या कंठातून निनादत राहिले. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर आचार्य अत्रे म्हणाले होते, ‘महाराष्ट्रात जन्माला आल्याबद्दल कृतार्थ वाटते. धन्य वाटते. भारतात अनेक भाषांची अनेक राज्ये आहेत. पण ‘महाराष्ट्र’ या नावातच केवढे आव्हान, अभिमान आणि भावना भरलेली आहे.’ महाराष्ट्राच्या या परंपरेशी इमान राखूनच मी गेली दोन वर्षे या राज्याची धुरा सांभाळतो आहे. शेतकरी, महिला, आदिवासी, युवकांच्या प्रगतीची दारे उघडावीत, त्यांना आकाश खुले व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. देशाचे यशस्वी, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

स्वतःचा परीघ वाढवणे हा राजकीय डावपेचाचा भाग

राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि श्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून महाराष्ट्राने प्रगतीची कास धरली आहे.समृद्धी महामार्ग, अटल सेतू, कोस्टल रोड अशा मोठ्या योजना मार्गी लागल्या आहेत. परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यामुळे घराबाहेरील जग त्यांना खुले झाले आहे. ‘शासन आपल्या दारी’सारख्या कल्पक योजनांमुळे नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी मला मिळाली. एका विचारातून, एका ध्येयातून आणि छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेतून हे राज्यशकट चालवताना जबाबदार विरोधकांची कमतरता जाणवत आहे. विरोधकांनी सरकारच्या कामावर टीका करायची असते, त्रुटी लक्षात आणून द्यायच्या असतात. परंतु गेल्या दोन वर्षांत विरोधकांनी निंदानालस्ती, अपशब्द, असभ्य भाषा यांचा वापर करीत महाराष्ट्राच्या शालीन परंपरेशी फारकत घेतल्याचे दिसले. एकमेकांना शह देणे, व्यूहरचना करणे, स्वतःचा परीघ वाढवणे हा राजकीय डावपेचाचा भाग असतो. परंतु सत्ता हातून गेल्यावर थयथयाट करणे आणि रूदालीचा सार्वजनिक प्रयोग करणे एवढेच विरोधक करत आले आहे.

एखादे राज्य सुसंस्कृत असेल तरच त्याच्या…

या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आजच्या या महाराष्ट्र दिनी मी विरोधकांना आवाहन करतो की, त्यांनी विधायक टीका करण्याची राज्याची परंपरा पुढे न्यावी, तिची बूज राखावी. सत्ता जाते आणि येते, परंतु प्रत्येक काळातील नेत्यांनी केलेली कामे ही विकासाची, दृष्टिकोनाची खूण असते. राज्याच्या प्रगतीचा, आर्थिक विकासाचा आजचा वेग कायम ठेवायचा असेल तर राज्यात आणि देशात एकाच विचारांची सत्ता असणे आवश्यक आहे. राज्याची जनता याचा विचार करेल, याची मला खात्री आहे. महाराष्ट्र दिनी मला उद्याच्या महाराष्ट्राचे उज्ज्वल चित्र दिसत आहे. सहा पदरी रस्ते, मोठमोठे पूल आणि दळणवळणाच्या सर्व आधुनिक सोयी सुविधांमधून सुजल, सफल आणि संपन्न महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी सज्ज आहे. पर्यावरण आणि विकास हातात हात घालून पुढे जात आहेत. एखादे राज्य सुसंस्कृत असेल तरच त्याच्या संपन्नतेला अर्थ प्राप्त होतो. त्यादृष्टीने मराठी भाषा भवनापासून तर पुस्तकांच्या गावापर्यंतचे अनेक प्रयोग शासन राबवित आहे. साहित्य, नाटक, चित्रपट यांना प्रोत्साहन आणि पुरस्कारही देत आहे. राज्याचे सांस्कृतिक धोरण आकार घेत आहे. महिलांसाठी विशेष धोरण आणले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार आमच्याजवळ आहे. याच विचारांच्या प्रकाशात आम्ही पुढील मार्ग दिसणार आहे. मी पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो. माय मराठीची माती ललाटी लावतो. तिचे ऋण फेडण्यासाठीच सत्ताकारण करण्याचे आपणांस वचन देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर

‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही, Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss