महादेव अँप आणि देशविरोधी गुन्हेगार असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणाऱ्या रशेश शहा आणि त्यांच्या एडलवाईस कंपनी आणि त्यामध्ये झालेल्या व्यवहाराची येत्या दोन महिन्यात चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. भाजपा आमदार आणि विधानसभा प्रतोद अँड आशिष शेलार यांनी एका मोठ्या गैरव्यवहार उघड करीत विधानसभेत नियम १०५ नुसार लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. महादेव अँपच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात ऑनलाईन अनधिकृत बेटींग करण्यासाठी अनेक बेटींग अँपच्या निर्मिती करुन सदर बेटींग अँपच्या माध्यमातून देशभरातील अनेक सामान्य गरीब माणसांची फसवणूक करण्यात आली. या ॲपमधील पैसे बांग्लादेशी नागरिकांचे बनावट भारतीय कागदपत्रे बनवून एयु स्मॉल फायनान्स बँक या बँकेत हजारो बनावट खाते उघडून यातून आर्थिक व्यवहार केले गेले. तसेच शासनास बुडविल्याप्रकरणी देय असलेला २८ टक्के सेवा व वस्तुकर चुकवल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या एफआयआरमधील आरोपी क्र.२ अमित शर्मा हा मुंबई बॉम्ब स्फोट हल्ल्यातील आरोपी व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचा भाऊ मुस्ताकीन याचा भागीदार असून या दोघांवर महादेव अँप चालवण्याचा आरोप आहे. तसेच विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा, मुंबईतील बांधकाम व्यावसायिक कंपनीत या दोघांनी पैसे गुंतविलेले आहेत. या कंपनीचे मुंबईत गोरेगाव आणि मिरा रोड येथे सरु असून अंडरवर्ल्डचा पैसा बांधकाम व्यावसायात आणला गेल्याची माहिती समोर आली आहे, असा आरोप आमदार अँड आशिष शेलार यांनी केला. या अमित शर्मा आणि विजय जैन यांचा मुंबईत गोरेगाव येथे सुरु असलेल्या जे पी डेक हा बांधकाम प्रकल्पाला रशेश शहा यांच्या एडलवाईस (EDELWEISS) या वादग्रस्त फायनान्स कंपनीने १ हजार कोटी रुपयांचा फायनान्स केला आहे, असाही गंभीर आरोप ही आमदार आशिष शेलार यांनी या लक्षवेधीवर चर्चा करताना केला. अशा प्रकारे देशविरोधी गुन्हेगार असलेल्या दाऊदशी संबंध असलेल्या अमित शर्मा यांच्या कंपनीला पैसे पुरविणे यावर अमित शर्मा व रशेश शहा एडलवाईस या कंपनीची त्वरीत चौकशी करुन यातील दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली.
यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महादेव अँपची ईडी मार्फत चौकशी करण्यात आली असून संपूर्ण देशभरातील विविध राज्यात या गुन्ह्याची व्याप्ती असून या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तर आज आमदार अँड आशिष शेलार यांनी जी माहिती दिली. त्या प्रकरणातील विजय जैन यांच्या जे.पी. इन्फ्रा या बांधकाम व्यावसायिक कंपनी, अमित शर्मा, एडलवाईस आणि रशेश शहा यांच्या मध्ये झालेल्या संपूर्ण व्यवहारात करण्यात आलेली गुंतवणूकीचा हेतू काय आहे? हा पैसा कायदेशीर मार्गाने बँकेच्या माध्यमातून आला की काळा पैसा यामध्ये टाकण्यात आला? यामध्ये काही गैरव्यवहार आहे का? यामध्ये गुन्हेगारी संबंध आहेत का? या सगळ्याबाबत येत्या दोन महिन्यांत चौकशी करण्यात येईल, जर गैरव्यवहार आढला तर कारवाई करण्यात येईल,असे उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केले.
दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले की, सदर गुन्ह्यात बेटींगसाठी व ऑनलाईन खेळ खेळण्याकरिता पैसे जमा करण्यासाठी तसेच जिंकलेले पैसे पाठविण्याकरिता वापर करण्यात आलेल्या बँक खात्याची माहिती प्राप्त झाली असून, त्यानुसार AU SMALL FINANCE BANK यांची एकूण १६ खाती असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी १५ बँक खात्याची/ खातेधारकांची माहिती प्राप्त झालेली आहे. सदरची बँक खाती ही महाराष्ट्र, राजस्थान, नवी दिल्ली, आसाम, मध्यप्रदेश व हरियाना या राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर बँक खात्यांची/खातेधारकांची पडताळणी करण्याचे काम सुरु आहे. तसेच, बेटींग अँप कंपन्यांकडून त्यांना मिळालेल्या नफ्यातील रक्कमेवरील जीएसटी न भरता सरकारी तिजोरीचे प्रचंड नुकसान केले असल्याबाबत सखोल तपास करण्यात येत आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीतील आरोपी क्र.०२ अमीत शर्मा हा आरोपी क्र. २१ व २२ यांचा सहकारी असल्याचे व विविध बेटींग अँपमध्ये त्यांचा भागीदार असल्याचे, आरोपी क्र.२१ यांचा गुन्हेगारी जगताशी संपर्क असून मुस्ताकीन याचेशी संबंध असल्याचे, तसेच या तिघांनी मिळून मुंबई व मिरारोड मधील काही बांधकाम विकासकांसोबत गुंतवणूक केल्यासंदर्भात बांधकाम विकासकाचे नाव, तसेच कोणत्याही फायनान्स कंपनीने निधी पुरविल्याची बाबी तपासण्यात येत आहेत. सदरील बाबी तपासात निष्पन्न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा :
KL Rahul ने बुमराहबद्दल सांगितली एक गोष्ट, म्हणाला…