Saturday, July 27, 2024

Latest Posts

महाविद्यालय परिसर नशामुक्त ठेवा, राज्यपालांचे निर्देश

राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू संयुक्त मंडळाची बैठक झाली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत. यासाठी त्यांच्या भविष्याचा विचार करून सर्व विद्यापीठांनी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करावेत, असे निर्देश राज्यपाल रमेश बैस यांनी दिले.
राज्यपाल बैस म्हणाले की,  महाविद्यालयांनी एकत्रित येऊन  क्लस्टर युनिव्हर्सिटी बनविण्याचा प्रयत्न करावा. तसेच विद्यापीठांनी ऑलिम्पिक विजेते खेळाडू तयार होण्यासाठी प्रयत्न करावेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासन अग्रेसर आहे. प्रत्येक कुलगुरूंनी विद्यापीठांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी आणि केलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर अहवाल पाठवावा. कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आणि व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर देऊन रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे. उच्च शिक्षणामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. एनआयआरएफ (NIRF) रैंकिंगमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील विविध महाविद्यालये, विद्यापीठाचा समावेश वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षाही यावेळी राज्यपाल बैस यांनी व्यक्त केली. यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३५० वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्त पारंपरिक खेळांना प्रोत्साहन द्यावे. महाविद्यालय हे समाज परिवर्तनाचे माध्यम आहे. प्रत्येक कुलगुरूंनी ग्रामीण भागातील दहा गावे दत्तक घेऊन  त्यांचा सामाजिक विकास कसा होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. महाविद्यालय परिसर हा नशामुक्त ठेवण्याचे आवाहनही राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.
महा-स्वयंम, ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म, नवीन क्रेडिट अभ्यासक्रम अंमलबजावणी आणि  स्थिती व स्वायत्त महाविद्यालयासमोरील अडचणी, ई-समर्थ प्लॅटफॉर्म अंमलबजावणी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणीसाठी अहवाल, उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून राज्य शासनाच्या विविध विभागात इंटर्नशिप धोरण आणण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव येणार आहे. त्याची अंमलबजावणी करणे, तसेच विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील संस्थात्मक इंटर्नशिप धोरण आणि विभागांसाठी इंटर्नशिप धोरण अंमलबजावणी करणे, छत्रपती शिवाजी महाराज चरित्रावरील अभ्यास शिबिरांचे आयोजन करणे अशा महत्वपूर्ण विषयांबाबत सविस्तर चर्चेद्वारे सादरीकरण करण्यात आले. विद्यापीठाने पदवी प्रमाणपत्र डिजीलॉकर सुविधेद्वारे विद्यार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच पदवी प्रमाणपत्र  वापरता येईल, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Latest Posts

Don't Miss