मुंबईकरानो रविवारी तुम्ही जर लोकलने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. रविवारी सकाळपासूनच रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने दुरुस्ती आणि डागडुजीच्या कामासाठी रविवारी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक जाहीर करण्यात केल्याने रविवारी पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही. त्यासाठी रविवारी कामासाठी आणि बाहेर फिरायला जाणाऱ्यांनी मेगाब्लॉकच्या वेळा जाणून घ्या.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध-जलद लोकल फेऱ्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि त्यांच्या नेहमीच्या थांब्यांवर आणि कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबा घेतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १० मिनिटे उशीराने पोहचतील.सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद लोकल फेऱ्या कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबून पुढे मुलुंड स्थानकांवर पुन्हा अप जलद मार्गावर पूर्ववत चालविण्यात येतील आणि आपल्या गंतव्यस्थानी त्या १० मिनिटे उशीराने पोहचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई/दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल-एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळविण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणार्या अप मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३. ३६ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१६ ते दुपारी ३. ४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
पश्चिम रेल्वेवर दिवसा ब्लॉक घेतला जाणार नाही. परंतू मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या शनिवारी रात्री १२ ते रविवारी पहाटे ४ वाजे दरम्यान चार तासांचा मेन्टेनन्स ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात सर्व जलद लोकल सांताक्रुझ ते चर्चगेट दरम्यान धीम्या मार्गावरुन चालविण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशच्या बोल्ड अंदाजाला नेटकऱ्याची नाराजी,उर्फीची बरोबरी करणार…
पिंपरी चिंचवडमध्ये लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल