Friday, April 19, 2024

Latest Posts

लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात – CM Eknath Shinde

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त वांद्रे येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शासन आणि प्रशासन ही लोकशाही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके समान वेगाने धावलीत की विकास वेगाने होतो. याचे उदाहरण राज्यात पहायला मिळत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
 
राज्याच्या कारभारात अधिकाऱ्यांचे मोठे योगदान असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्याच्या कारभारात तुमचे काम महत्वाचे आहे. नियमांचे पालन करून अधिकारी काम करत असतात. काम नियमांमध्ये कसे करावे याचे चांगले ज्ञान अधिकारी वर्गाकडे आहे. अधिकारी हे शासनाचे अविभाज्य अंग आहे. राज्याचा गाडा हाकताना रथाची चाके आपण आहोतच. पण त्याचबरोबर या चाकांमध्ये वंगण घालण्याचे काम ही अधिकारी वर्ग करत असतो. शासन आणि प्रशासन यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे राज्यात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  शासन राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी अनेक योजना राबवत आहे. अनेक लोककल्याणकारी निर्णय घेत आहे. या योजना आणि निर्णय लोकांपर्यंत पोहचवण्याचे आणि त्याचा लाभ लोकांना देण्याचे काम प्रशासन करत आहे. सरकारची प्रतिमा निर्माण करण्याचे काम अधिकारी करत आहेत. लोकांच्या जीवनात चांगले दिवस येतील ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी योजनांची अंमलबजावणी अधिकारी करत असतात. राज्यात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी होत आहे. त्यामुळेच आज राज्यात परदेशी गुंतवणूकदार आकर्षित होत आहेत. गेल्या वर्षी दावोस येथे करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी ८० टक्के करार पूर्ण झाले आहेत. यंदा ३५३ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. उद्योगांसाठी पोषक वातावरण असलेले राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. देशात परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. जीडीपी मध्येही राज्याचा मोठा वाटा आहे. हे सर्व आपण अधिकाऱ्यांच्या जोरावर करत आहोत. लोकांच्या भल्यासाठी काम करणारे अधिकारी लोकप्रिय असतात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी कोकण विभागाचे आयुक्त महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, राजेंद्र भोसले, महासंघाचे मुख्य सल्लागार कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, कोशाध्यक्ष नितीन काळे, कल्याण केंद्र समन्वयक टाव्हरे, सरचिटणीस समीर भाटकर उपस्थित होते.
 

Latest Posts

Don't Miss