Monday, May 13, 2024

Latest Posts

नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते – CM Eknath Shinde

रंगभूमी मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदचे शंभरावे विभागीय नाट्य संमेलन महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य नगरी या ठिकाणी संपन्न होत आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राला कला आणि संस्कृतीचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नाट्य संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार आहेत.  यामध्ये ५२  नाट्यगृहांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून उर्वरित नाट्यगृहे नव्याने उभारण्यात येणार आहेत. ती सर्व सुविधा संपन्न असावीत व परिपूर्ण असावी यासाठी अकरा तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
अनेक थोर कलाकारांच्या योगदानातून मराठी रंगभूमी बहरली. नाट्य रसिकांच्या पसंतीस उतरण्यासाठी काळानुरूप रंगभूमीने अनेक बदल स्वीकारले. त्यामुळेच व्यावसायिक सोबत प्रायोगिक रंगभूमीलाही चोखंदळ रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. अनेक अडचणींवर मात करत सध्या मराठी रंगभूमी पुढे जात आहे. अशावेळी नाट्यसंमेलनांसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरतात, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, अशा नाट्यसंमेलनांमधून नवकलाकार उदयास आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य घडते. यातूनच स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध होतो. महाबळेश्वर येथे होत असलेल्या विभागीय नाट्यसंमेलनाप्रमाणेच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये नाट्य संमेलने होत आहेत. यातून गौरवशाली नाट्य संस्कृतीचा विस्तार दिग्गज कलाकार करत आहेत. नाट्यकलेमध्ये कार्य करणारे कलाकार हे सेवाभाव घेऊन नाट्य संस्कृती जोपासत असतात. कलेला जेंव्हा रसिक दाद देतात तेव्हांच कलाकार कला समृद्ध करू शकतो. यावेळी त्यांनी जेष्ठ कलाकार अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण देऊन महाराष्ट्र शासनाने गौरव केल्याचेही सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर येथे दोन हजार प्रेक्षक क्षमतेचे नाट्यगृह असून ते सध्या बंद स्थितीत आहे. हे नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देण्याची सूचनाही त्यांनी केली. मुंबई येथील फिल्म सिटी बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ही फिल्म सिटी आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यात येणार आहे. मराठी भाषा व नाट्य चळवळ यांना बळ देण्यासाठी शासन नेहमीच सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,  नरेश गडेकर, भाऊसाहेब भोईर, अजित भुरे, सतीश लोटके यांच्यासह विविध दिग्गज मान्यवर, कलाकार, नाट्य परिषदेचे पदाधिकारी, रसिक आदी उपस्थित होते.
हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss