Thursday, February 29, 2024

Latest Posts

दरवर्षी का होतो कांद्याचा वांदा? निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना किती बसतो फटका? जाणून घ्या सविस्तर माहिती

कमीत कमी पाणी आणि चांगला नफा मिळवून देणार पीक म्हणून कांद्याची ओळख आहे.

कमीत कमी पाणी आणि चांगला नफा मिळवून देणार पीक म्हणून कांद्याची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा पिकाचे मोठे अर्थकारण आहे. पण आता बाजार भावातील अनिश्‍चिततेमुळे कांदा उत्पादक शेतकरी होरपळून निघत आहे. प्रत्येक वर्षी देशात कांद्याचा प्रश्न निर्माण होतो. कधी कांद्याच्या दरात वाढ तर कधी कांद्याच्या दरात कपात होत असते. कांद्याच्या दरात वाढ झाली की सरकारकडून दर कमी करण्यासाठी काहीतरी धोरण अवलंबली जातात. त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. नेमके देशात कांद्याचे दर कसे पाडले जातात? कांद्याचा वांदा का होतो? याबाबत जाणून घेऊया सविस्तर माहिती.

यंदाच्या वर्षी कांद्याला चांगला दर मिळाला होता. अशातच सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावली. यामुळे यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटनांनी मोठा विरोध केला आहे. तसेच केंद्र सरकारने निर्यात बंदी उठवावी अशी मागणी करण्यात येत आहे. कांद्याचे दर घसरण्याला नेमकं कोण जबाबदार आहे, याची सविस्तर माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे यांनी दिली आहे.कांद्याच्या दरात घसरण होण्यासाठी सरकार सर्वस्वी जबाबदार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रमुख भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. शेतकरी ज्यावेळी कांद्याचे पीक घेतो त्यावेळी सरकार काहीच पुरवत नाही. मेहनत शेतकऱ्यांची, खर्च शेतकऱ्याचा, कर्ज, जमिन, पाणी शेतकऱ्याचे मग त्यावर सरकारचे नियंत्रण कशासाठी? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे. वेळेस बाजारात कांद्याचे दर घसरले जातात, तेव्हा सरकार काहीच बोलत नाही. मात्र, दर ज्यावेळी वाढतात त्यावेळी मात्र, सरकार हस्तक्षेप करत आहे. राज्यातील छोटा शेतकऱ्याचे कांदा हे प्रमुख पिकं आहे. कांदा सोडून दुसरे पिक केले तर त्यांची कुटुंब चालणार नाहीत. कमी काळात, कमी पाण्यात कांद्याचे पिकं निघते, त्यामुळं छोटे शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. मात्र, सरकारच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे दिघोळे म्हणाले.

सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोकळं सोडावं, नियंत्रण ठेवू नये. सरकार कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याचे म्हणत आहे मात्र अनेक ठिकाणी कांदा उतरवण्यासाठी जागा नाही. भारतातील लोकांनी जर कांदा पिकवला नाही तर जगात कांद्याचा तुटवडा भासू शकतो असे दिघोळे म्हणाले. देशभरात तीन प्रकारचा कांदा पिकवला जातो. लाल कांदा, रांगडा कांदा, उन्हाळी कांदा असे तीन प्रकारचे कांदे पिकवले जातात.

लाल कांदा:-

अल्पभूधारक शेतकरी हे लाल कांद्याची शेती करतात. या शेतकऱ्यांकडे शेती कमी प्रमाणात असते. जून जुलै दरम्यान या कांद्याची लागवड केली जाते. तर हा कांदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्य विक्रीसाठी बाजारात येतो. लाल कांद्याचे एकर उत्पादन ५ ते ८ टन एवढे आहे. या कांद्याच्या शेतीपुढे खूप नैसर्गिक संकट आहेत. अति पाऊस किंवा दुष्काळ यामुळे हा कांदा वाया जाण्याची भीती असते. लाल कांद्याच्या एक एकर शेतीसाठी ३०,००० ते ४०,००० खर्च येतो.

रांगडा कांदा:- 

रांगडा कांदा हा प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यातील शेतकरी करतात. पाणी कमी पडेल म्हणून ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये कांद्याची लागवड होते. पावसाळा संपण्याच्या उत्तरार्धात या कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवरीमध्ये काढला जातो. रांगडा कांदा साठवणुकीला जास्त दिवस ठेवता येत नाही. पटकण विकणे हाच पर्याय शेतकऱ्यांसमोर असतो. लाल कांदाही जास्त दिवस साठवता येत नाही. रांगडा कांद्याचे उत्पादन हे एकरी ८ ते १० टन होते. रांगड्या कांद्याला एकरी ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो.

उन्हाळी कांदा:- 

ज्या शेतकऱ्याला शाश्वत पाणी आहे, ज्याच्याकडे मुबलक जमिन आहे, असे शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करतात. ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च, एप्रिल महिन्यामध्ये काढला जातो. उन्हाळी कांद्याची टिकवण क्षमता ही ३ ते ६ महिने असते. काढणी केल्यावर हा कांदा जून ऑगस्ट किंवा डिसेंबरमध्येही विकू शकतो. या कांद्याला विक्रीसाठी दिवस भरपूर मिळतात. त्याचा एवढा प्रश्न येत नाही. जेव्हा कांद्याला दर असेल तेव्हा हा कांदा विक्री करता येतो. या कांद्याला एकरी १५ टन उत्पादन घेता येतं. उन्हाळी कांद्याला एकरी उन्हाळ ८० हजार ते १ लाख रुपयांचा खर्त होतो.

Latest Posts

Don't Miss