छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना वडेट्टीवार बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले की,पुण्यात नवीन मुळशी पॅटर्न सुरू झालाय. या नव्या मुळशी पॅटर्नचे खरे आश्रयदाते कोण आहेत. याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. आजी माजी नेत्यांमध्ये गुन्हेगार वापरण्यावरून वाद सुरू झाले आहेत. पुण्यातल्या गुंडांना क्राईम ब्रँचच्या काही सेवानिवृत्त अधिकाऱ्याचे मार्गदर्शन आहे. हा सेवा निवृत्त अधिकारी नोकरीत असताना आणि नोकरीत नसतानाही पुण्यातल्या टोळ्या चालवतोय. राजकीय पदाधिकाऱ्यांना नेत्यांना धमकावण्यासाठी गुंडांना पॅरोलवर सोडले जातेय. पुण्यात २०० गुंडांची परेड करण्याची वेळ आली. हे दुर्देव आहे. पुण्यात अमितेश कुमारांनी गुंडांची परेड घेतली. त्यानंतर काही दिवसातच २२०० कोटींचे ड्रग्ज सापडले. इतकी गंभीर परिस्थिती पुण्यात असल्याचे खडे बोल वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विचारंवत विश्वंभर चौधरी यांच्यावर केलेला हल्ला म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. दहशत निर्माण करणारी ही तालिबानी वृत्ती आहे. पत्रकारांवर ही वेळ येत असेल तर राज्यात सुरक्षित आहे कोण हा खरा प्रश्न आहे. भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे, मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली. हे इजा-बिजा-तिजा सरकार महाराष्ट्राला उद्धवस्त करेल, अशी परिस्थीती आहे. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जावून भेट घेतली. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. याच मुख्यमंत्र्यांच्या काळात वर्षा निवासस्थानावर ड्रग प्रकरणातील आरोपीने गणपतीची आरती केली होती.
या सरकारने पोसलेले गुंड कंत्राटदारांना धमकावत आहेत. याबाबत कंत्राटदार संघटनांनी इतिहासात पहिल्यांदा तक्रार केली आहे. शासनाची विकासकामे राजाश्रय असलेल्या गुंडांकडून बंद पाडली जात आहेत. सरकारमधील कोल्डवॉरची जागा शस्त्र घेतील. काही दिवसांनी यांची मजल एकमेकांवर बाँम्ब फेकण्यापर्यंत जाणार आहे. इतकी सत्तेची लालसा, हव्यास या इजा-बिजा-तिजा मध्ये भरली आहे. शिवसेनेचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. अभिषेक घोसळकर या लोकप्रिय नेत्याला संपवलं. या हत्येमागे कुणाचा हात आहे हे शोधले पाहिजे. ठाणे जिल्ह्यात संकेत भोसले याच्या अपहरणानंतर त्याला बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला होता. जीव वाचविण्यासाठी पोलिस ठाण्यात संकेत धाव घेत होता. मात्र, पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडली नसल्याचे सांगून टाळाटाळ केली. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संकेतचा जीव वाचू शकला असता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. हा संकेत मागसवर्गीय होता. मागासर्वीय तरूणाची ही अवस्था कोणामुळे झाली. याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. नागपुरात्या हत्यांच सत्र थांबत नाही. नागपुरात प्रेस फोटोग्राफरची हत्या झाली. गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली कुठे? मुख्यमंत्री मौनात आहेत. अजित पवारांना काय बोलायच कळत नाही, असे खडे बोल देखील वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत.
महायुती सरकारचे गुंडांना अभय आहे. गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी केली जातेय आणि सामान्य माणूस मात्र मंत्रालयाबाहेर रांगेत उभा आहे. सत्ताधारी पक्षाचा नेता आई आणि मुलीवर बलात्कार करतो. त्यावर कोणी बोलत नाही या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचा आशिर्वाद आहे. चिपळूणमध्ये सरकारच्या आशीर्वादाने बाहेरील गुंड मागवून राडा करण्यात आला. राडा संस्कृतीला सरकारकडून खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यातली कायदा सुव्यस्था धाब्यावर आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला सत्ताधारी लोकप्रनिधींकडून वारंवार गालबोट लावले जात आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधी वारंवार समाज विघातक कृत्ये करत असल्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे. लोकप्रतिनीधी पोलीसांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरले जातात. हे दुर्दैव आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.
हे ही वाचा:
सनी लिओनी बनली गरजू मुलांसाठी सांता,गिफ्ट देत साजरा केला खास पद्धतीत ख्रिसमस
बॉक्स ऑफिसवर शाहरुखच्या ‘डंकी’ ची निराशाच,कमाईत अपयशी