Saturday, July 27, 2024

Latest Posts

आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून अस्पृश्यांचं “नायकत्व” स्वीकारलं – Jitendra Awhad

"जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल"

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १०४ वर्षांपूर्वी सुरु केलेले ‘मूकनायक’ पाक्षिक मराठी पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची स्थापना करणारी घटना ठरली. मूकनायक या वृत्तपत्राचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० साली मुंबई येथे प्रकाशित करण्यात आला होता. आपल्या चळवळीची भूमिका आणि समाजाचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी वर्तमानपत्राची आवश्यकता आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाणून होते. त्याच पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली. मूकनायक या वर्तमानपत्राचा १०४ वा वर्धापन दिन असल्याने राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडीयाच्याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मूकनायक याबाबत भाष्य केले आहे. 

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

मुक्यांचा नायक मूकनायक..!

“मूकनायक” वृत्तपत्र काढणे हे त्याकाळी अतिशय महत्वाचे होते. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दलित, शोषित, पीडितांच्या व्यथा-वेदनांना वाचा फोडायची होती. अस्पृश्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी द्यायची होती. अस्पृष्य समाजाच्या सामाजिक जीवनाची दिशा बदलायची होती. अस्पृश्यांतील नवा माणूस परंपरागत मानसिकता झुगारून स्वतःची नवी सृष्टी निर्माण करणारा असेल अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धारणा होती. त्या धारणेला बळ मिळावं म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्रासारखे माध्यम स्वीकारले. आणि ३१ जानेवारी १९२० रोजी “मूकनायक” या वृत्तपत्राची सुरुवात केली.

भारतातील बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु, मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट जातींचे हितसंबंध पाहाणारी आहेत. इतर जातीच्या हिताची त्यांना परवा नसते. इतकेच नव्हे तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात’. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘मूकनायक’ हे पाक्षिक वृत्तपत्र सुरू करताना पहिल्या अंकात आपली भूमिका या प्रकारे मांडली होती.

हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे

“जर या हिंदुस्थान देशातील सृष्ट पदार्थांच्या व मानवजातीच्या चित्रपटाकडे प्रेक्षक या नात्याने पाहिले तर, हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे, असे निःसंशय दिसेल”, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मूकनायक’च्या पहिल्या अंकात लिहिलेल्या लेखामधलं आरंभिक वाक्य आहे. त्याकाळी अस्पृश्यांच्या मुख्य प्रश्नांना वृत्तपत्रात कुठेही स्थान नव्हते. अशावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “मूकनायक” वृत्तपत्र सुरू करून अस्पृश्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून अस्पृश्यांच “नायकत्व” स्वीकारलं. अशा या मुक्यांचा “मूकनायक” वृत्तपत्र वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! जय भीम..!

हे ही वाचा:

Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी PM Modi यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर,शेअर केला व्हिडिओ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss