Sunday, April 28, 2024

Latest Posts

Gajanan Kirtikar यांची एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका, उत्तर – पश्चिममधून कीर्तिकरांना मिळणार नारळ

'अबकी बार ४०० पार' असा नारा देत लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपने अत्यंत आक्रमकपणे लोकसभा निवडणुकांना सामोरे जायचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या जागाही घेचून घ्यायला भाजपने रणनीती आखली आहे.

‘अबकी बार ४०० पार’ असा नारा देत लोकसभा निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भाजपने अत्यंत आक्रमकपणे लोकसभा निवडणुकांना सामोरे जायचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या जागाही घेचून घ्यायला भाजपने रणनीती आखली आहे. त्याच रणनीतीनुसार जास्तीत जास्त उमेदवारांना कमळ निशाणीवर निवडणूक लढवून विजयी करण्याचा भाजप पक्ष श्रेष्ठीचा प्रयत्न आहे. तर ७५ ओलांडलेल्या उमेदवारांना सर्वसाधारणपणे तिकिटं देऊ नये असे डावपेचही मोदी – शाह यांनी आखलेले आहेत. याच डावपेचांचा फटका शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांना बसण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांना आपली तिकट कापली जाण्याची भीती आहे. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वरच हल्ला चढवून आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायचे ठरवले आहे.

शिवसेनेचे जेष्ठ नेते गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ८० वर्षाचे गजानन कीर्तिकर हे संघटन कौशल्य आणि भूमिपुत्रांचा आवाज उठवण्यासाठी ओळखले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असलेले गजानन कीर्तिकर यांचे उद्धव ठाकरेंबरोबर फारसे सूर जुळू शकले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान देत भाजप बरोबर पुन्हा युती केली. त्यानंतर गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेले. त्याच वेळी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर हा मात्र ठाकरे गटातच राहिला. अमोल कीर्तिकर हा आदित्य ठाकरे यांचा विश्वासू सहकारी म्हणून शिवसेनेच्या वर्तुळात परिचित आहे. वडिलांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर याचीच घोषणा केली आहे. आगामी निवडणुकीसाठी उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून भाजपाला आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा आहे. त्यामुळे वय वाढलेल्या गजानन कीर्तिकर यांना विश्रांती देणं हा या रणनीतीचा भाग आहे. येत्या निवडणुकीत आपलं तिकीट कापलं जाईल या भीतिपोटी गजाजन कीर्तिकर यांनी थेट शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच थेट हल्ला चढवला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत २२ जागा लढवणाऱ्या शिवसेनेने १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या खेपेसही २२ – २६ असा फॉर्मुला करताना शिवसेना भाजपने आपापल्या कोठ्यातील काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्याव्या अशी संकल्पना मांडत कीर्तिकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णय क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वृत्तवाहिन्यांबरोबर बोलताना खासदार आणि शिवसेना नेते गजानन कीर्तिकर म्हणाले, जागा वाटपाच्या वाटाघाटी कुठे झाल्यात? जर झाल्या असतील तर आम्हाला तपशील का कळला नाही? १३ जागांचा आकडा नेमका कुठून आला? १८ खासदार असताना भाजप १३ जागांवर आमची बोळवण करत असेल तर ती जबाबदारी कोणाची आहे? असे प्रश्न करत खासदार कीर्तिकर म्हणाले जे लोकप्रतिनिधी शिंदेच्या बरोबर आलेले आहेत त्यांचं राजकीय पुर्नवसन करणं आणि त्यांची जबाबदारी पेलणं हे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांचे कर्तव्य आहे. याआधी गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये ही वाद झाला होता. तो वाद मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठ्या कौशल्याने हाताळत सोडवला होता. आता गजानन कीर्तिकर यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्णय कक्षेवरच हल्ला चढवला आहे. त्यामुळे आधीच मंत्रिपदावरून धुसफूस असणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेत नव्या नाराजीला तोंड फुटले आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात अमोल कीर्तिकर विरुद्ध गजानन कीर्तिकर असा पिता – पुत्र असा मुकाबला झाल्यास मॅच फिक्सिंग होण्याची मोठी भीती भाजपसहित मुख्यमंत्री शिंदे यांनाही वाटत आहे. त्यामुळेच कीर्तिकर यांच्या जागी तगडा उमेदवार द्यावा असा भाजपचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांचा फटका बसू शकणारे कीर्तिकर शिंदेंवर टीका करून किंवा त्यांच्या निर्णय कक्षेला आव्हान देऊन पक्षातील आपलं उपद्रवमूल्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना नाव न सांगण्याच्या अटीवर एक नेता म्हणाला गजानन कीर्तिकर हे जेष्ठ नेते आहेत. पण त्यांचं वागणं हे कधीही जेष्ठतेला साजेसे नसते हे यापूर्वीही अनेकवेळा स्पष्ट झालेले आहे. कधी रामदास कदम तर कधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत कीर्तिकर यांना आपला पॉलिटीकल रिटायरमेंट प्लॅन बनवायचा आहे. त्यासाठीच कीर्तिकर यांची ही शेवटची फडफड सुरु आहे. याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कीर्तिकर यांच्या बाबतीत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे असाही हा नेता म्हणाला. त्यामुळे गजानन कीर्तिकर यांच्या बाबतीत आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाबाबत काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde आणि Narayan Rane यांची बंद दाराआड चर्चा

नाशिकमधील ‘या’ भागांत पाणीपुरवठा असणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss