spot_img
Sunday, December 15, 2024
spot_img

Latest Posts

शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली- CM Eknath Shinde

शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना  श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.

लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण

नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रचंड निष्ठा असलेले आणि त्यांना अपेक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी मनापासून योगदान देणारे एक शिस्तबध्द आणि खंबीर नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. महाराष्ट्र, मराठी माणसाविषयी त्यांना मनापासून आत्मीयता होती. महाराष्ट्राच्या राजकारणातला अभ्यासू आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची ओळख. सर, अतिशय नम्र, संयमी, हजरजबाबी आणि शिस्तप्रिय होते. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील त्यांची कामगिरी, योगदान आमूलाग्र बदल घडवणारे होते. शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना तळमळ होती. त्यामुळेच कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना शिक्षणाकडे वळवले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला शिवसैनिक 

शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचे नेतृत्व सरांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, भूमिकांचा आदर करून वाटचाल करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवरील कामाचा त्यांना दांडगा अनुभव होता. शिवसेनेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. आज आपण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रामाणिक असलेला एक कडवट, सच्चा शिवसैनिक गमावला आहे. सरांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जोशी कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत… भावपूर्ण श्रद्धांजली ! असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde आणि Narayan Rane यांची बंद दाराआड चर्चा

नाशिकमधील ‘या’ भागांत पाणीपुरवठा असणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss