खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे आकस्मित निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने काल दुपारी अनिल बाबर (Anil Babar) यांना सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार होते. बाबर यांची पाणीदार आमदार म्हणून ओळख होती. बाबर यांच्या निधनामुळे राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आमदार बाबर यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी, सिंचनासाठी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी तसेच टेंभू योजना कार्यान्वित व्हावी, म्हणून ते सतत झगडत होते. बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनिल बाबर यांच्याबाबत शोक व्यक्त करतांना म्हणाले की, विधानसभा सदस्य अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. त्यांच्या निधनाने एक संवेदनशील लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ते सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य ते ४ वेळा विधानसभा सदस्य अशी प्रदीर्घ त्यांची राजकीय कारकिर्द राहिली. मतदारसंघातील प्रश्न घेऊन ते सातत्याने भेटत असत. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे, मनाला अत्यंत वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.ॐ शांती. अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
१९ व्या वर्षी राजकारणात पाऊल
अनिल बाबर हे २०१९ मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. अनिल बाबर चार वेळा आमदार झाले. १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे ४ वेळा ते आमदार राहिलेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या १९ व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते. शिवसेना पक्षात मोठा भूकंप झाल्यानंतर आमदार अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा:
Budget Session 2024 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी PM Modi यांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले
स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर,शेअर केला व्हिडिओ