सध्या राज्यभरात हिवाळी अधिवेशनाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ७ डिसेंबर पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. सभागृहात वेग-वेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली जात आहे. याचबरोबर, मंत्री एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. याबाबतच, रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी अपूर्ण राहिलेल्या कामांबद्दल भाष्य केले आहे. तसेच, या सर्व गोष्टींचा हिशोब जनताच करेल, असे म्हटले आहे.
काय आहे रोहित पवार यांची पोस्ट?
सभागृहात आज आरोग्य विभागाच्या लक्षवेधीवरील चर्चा ऑनलाईन बघितली. सभागृहातील चर्चेत आरोग्यमंत्र्यांनी दिलेली उत्तरं आणि सत्ताधारी आमदारांनी आरोग्यमंत्र्यांचं केलेलं कौतुक बघितलं तर राज्यात आरोग्य यंत्रणा अतिशय मजबूत आहे, असाच या सर्वांचा समज दिसत असला तरी प्रत्यक्षात वस्तूस्थिती पूर्णतः वेगळी आहे. राज्यात सर्वत्र हिमोग्लोबिन, फोलिक ॲसिडसह बहुतांश औषधांचा तुडवडा आहे. सर्दी खोकल्याची साथ सुरु असतानाही सरकारी दवाखान्यांमध्ये साधे खोकल्याचे औषध सुद्धा उपलब्ध नाही. काही ठिकाणी मशीन आहेत तर ऑपरेटर नाही. नर्स नाहीत. lab technician नाहीत. सर्वत्र भोंगळ कारभार सुरु आहे.
युवा संघर्ष यात्रेदरम्यान नांदगाव खंडेश्वर (जि. अमरावती) आरोग्य केंद्राला मी स्वतः भेट देऊन पाहणी केली. कर्मचाऱ्यांची चूक नाही, चूक सरकारची आहे. सरकारने औषधंच पुरवली नाहीत तर कर्मचारी तरी काय करणार? आज राज्यात रोज सरासरी ३५ नवजात बालकांचा मृत्यू होतो, यावर चर्चा होत नाही कारण ही बालकं गरिबांची असतात. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचा संप महिनाभर सुरु राहिला. या निष्ठूर आरोग्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांशी साधी चर्चाही केली नाही. हे आरोग्य कमर्चारी संपावर गेल्याने राज्यात जवळपास तीन लाखाहून अधिक बालकं आणि हजारो गर्भवती माता आरोग्य सेवेपासून वंचित राहत होत्या. या आरोग्य कर्मचाऱ्यांशी आम्ही स्वतः चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यांनाही आमचा मुद्दा पटला आणि त्यांनी संप मागे घेतला, पण तरीही आपल्या आरोग्यमंत्र्यांना जाग आली नाही. असो! यांचा हिशोब जनताच करेल…
हे ही वाचा:
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस गाजण्याची शक्यता
पुणेकरांनी मेट्रोकडे पाठ फिरवली, चार महिन्यात एवढ्या प्रमाणात उत्पादन घटले