महाविकास आघाडी कडून पत्रक जाहीर केल्यांनतर वाशीम येथे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी यांना महाविकास आघाडीच्या बैठकी दरम्यान बाहेर बसवल्याच्या मुद्यावरून विचारले असता, हा आमचा प्रतिनिधी असून त्याच्या सोबत काय घडलं, हे अद्याप माहीत नाही. महाविकास आघाडीमध्ये समावेश केले गेल्याचं, जे पत्र जारी केले आहे ते मी बघितले नाही. आमच्याकडे आल्यानंतर ते बघून आणि बोलू, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या समाज माध्यमावर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामील व्हावे, अशी भूमिका असल्याचे म्हटले आहे. ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांना दिलेल्या या पत्रकावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची सही आहे.
पत्रात काय लिहिले आहे?
देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे. दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.
हे ही वाचा:
अंदमानची टूर आणि दुरावा,प्रथमेशला भेटण्यासाठी मुग्धाची लगबग
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव – Cm Eknath Shinde