आपल्या अभिनयाच्या शैलीतून छाप पाडणाऱ्या आणि राजकारणासह सोशल मिडीयावर सक्रीय सहभाग असणाऱ्या अभिनेते किरण माने यांनी रोहित पवार यांच्याबाबत एक पोस्ट लिहिली होती. त्यावर आता रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. रोहित पवार यांनी किरण माने यांचे पोस्टद्वारे आभार मानले आहेत.
काय म्हणाले रोहित पवार?
धन्यवाद किरण जी! रणांगणात उतरल्यानंतर होणाऱ्या जखमांची आणि सांडणाऱ्या रक्ताच्या थेंबांची पर्वा करायची नसते! स्वाभिमानी महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून संविधान आणि लोकशाहीसाठी लढतोय. माझ्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील नागरिकांची आणि मराठी मातीबाबत अभिमान असलेल्या आपल्यासारख्यांची साथ हीच माझी शक्ती आहे! #लडेंगे_जितेंगे!
काय होती किरण माने यांची पोस्ट?
ईडीची धाड पडल्याची बातमी आल्या-आल्या रोहितदादांना मी फोन केला होता. दुपारचे दोन वगैरे वाजले असतील. रिंग झाली पण उचलला नाही. सहसा असं होत नाही. म्हटलं, नक्की त्या ईडीच्या चौकशीत असतील. त्यादिवशी संध्याकाळी माझ्या सासुरवाडीला धामणेरला एक कौटुंबिक कार्यक्रम होता तिकडे गेलो. सगळ्या पाहुण्यांच्या गराड्यात असताना फोन वाजला. स्क्रीनवर नाव बघतोय तर रोहितदादा! “बोला किरणजी. तुमचा मिसकाॅल दिसला.” मी अत्यंत कळकळीनं दादांना म्हणालो, “हे बघा दादा. ईडी येऊद्या, सीबीआय येऊद्या नायतर ते रंगाबिल्ला घरात येऊद्या. तुम्ही लाचार झालेले आम्हाला चालणार नाही. तुरूंग तर तुरूंग. आम्ही रस्त्यावर उतरून लढू तुमच्यासाठी. पण तुम्ही कसल्याही परिस्थितीत वळचणीला जाऊ नका.” रोहीतदादा हसले, “किरणजी, अजिबात चिंता करू नका. निर्धास्त रहा. मी हलत नाही.” आजपर्यंत सगळी चौकशी, जप्ती वगैरेंचा मनस्ताप सहन करून हा वाघ ताठ कण्यानं उभा आहे. मिटींग्ज घेतोय. सभा गाजवतोय. तिकीटं वाटपाच्या निर्णयात अधिकारवाणीनं मतं मांडतोय. देणारा हात आहे, तो कुणापुढं पसरणारा झालेला नाही! गड्याहो, आयुष्यात हा स्वाभिमान महत्त्वाचा. रोहितदादा, तुम्ही तो जपलात. आम्हाला तुमचा अभिमान आहे. आता लढायचं, झुंजायचं आणि जिंकायचं. बास. जय शिवराय… जय भीम.
हे ही वाचा:
शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये, संजय शिरसाटांनी केली गिरीश महाजनांवर टीका
Follow Us