Tuesday, May 21, 2024

Latest Posts

येत आहे कामदा एकादशी, जाणून घ्या काय आहे नेमकी कथा

कामदा एकादशीला पौराणिक महत्व आहे. या दिवशी श्री विष्णूंची पूजा केली जाते. मोक्ष आणि सुखसम्पन्नता प्राप्त करण्यासाठी कामदा एकादशीचे व्रत ठेवले जाते.

येत्या १९ एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे. कामदा एकादशीला पौराणिक महत्व आहे. या दिवशी श्री विष्णूंची पूजा केली जाते. मोक्ष आणि सुख संपन्नता प्राप्त करण्यासाठी कामदा एकादशीचे व्रत ठेवले जाते. महाराष्ट्रामध्ये कामदा एकादशी म्हटली की, पंढरपूरच्या विठ्ठलाची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. कामदा एकादशीचे व्रत करणाऱ्याला १०० यज्ञ केल्याबरोबर फळ प्राप्त होते असे म्हणतात. कामदा एकादशीदिवशी विधीनुसार व्रत केल्याने किंवा कथा ऐकल्या किंवा सांगितल्या तर पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते. कामदा एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाते. पण या व्रताचा नेमका इतिहास काय तो जाणून घेऊया.

प्राचीन काली भोगपुरी नावाची नागरी होती. तिच्यावर पुंडरिक नावाचा राजा राज्य करत असे. भोगीपूर अत्यंत संपन्न व सुखद नगरी होती. राजाच्या नगरीमध्ये अनेक लोक, ब्राम्हण, किन्नर, गंधर्व सुखाने नांदत होते. त्यातच ललित आणि ललिता नावाचे एक जोडपे देखील होते. त्यांच्यात खूप स्नेह होता. ते दोघे आनंदाने नांदत होते. एके दिवशी ललित दरबारात गात असताना त्याला अचानक आपली पत्नी ललिता हिची आठवण झाली. तिच्या आठवणीत तो इतका व्याकुळ झाला की तो गात आहे हे विसरून गेला. त्याचे बदललेले सूर राजाच्या लक्षात आले, व राजाने गंधर्व ललितला तू राक्षस होशील असा श्राप दिला. ललिताला हे समजल्यानंतर तिला खूप वाईट वाटले. आपल्या पतीला वाचवण्यासाठी ती शृंगी ऋषींच्या आश्रमात गेली. ललिताने सर्व हकीकत ऋषींना सांगितली व त्याच्या उद्गारासाठी उपाय मागितला. शृंगी ऋषींनी सांगितले की, जर येणार्‍या कामदा एकादशीचे व्रत तू पूर्ण केलेस तर, तुझा पती राक्षस योनीतुन मुक्त होऊन पुन्हा पहिल्यासारखा होईल. ललिताने ऋषींच्या आज्ञेचे पालन करून व्रत पार पाडले. व्रताचे फळ मिळताच तिचा पती राक्षस योनीतुन मुक्त झाला आणि पुन्हा पूर्वीसारखा झाला. यानंतर दोघेही आनंदाने राहू लागले. विष्णू पुराणात ही कथा मिळते. युधिष्ठिराच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने हीच कहाणी त्याला सांगितली होती.

हे ही वाचा:

खुसखुशीत पालक वडी आवडते? मग जाणून घ्या कृती…

आरोग्यासाठी गुणकारी अशा तुळशीच्या पानांचा उपयोग काय?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss