Tuesday, May 21, 2024

Latest Posts

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी पुढाकार घेण्यात आला आहे. जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे. या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.

१२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.

विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाज माध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणार्‍या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छूक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

हे ही वाचा:

लढाई फक्त VBA आणि BJP मध्ये, Prakash Ambedkar यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Nitin Gadkari यांच्यासारखा भ्रष्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात नाही, Congress नेत्याचे गंभीर आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss