Tuesday, May 21, 2024

Latest Posts

लढाई फक्त VBA आणि BJP मध्ये, Prakash Ambedkar यांचे कार्यकर्त्यांना पत्र

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर देशभरात वातावरण चांगलेच रंगात आले आहे. महाराष्ट्रातही राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्यभरात विविध पक्षांच्या प्रचारसभा पार पडत आहेत. यंदा प्रामुख्याने महायुती (Mahayuti), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) यांच्यामध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत. अश्यातच, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत खास वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी हे पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील हि लढाई केवळ वंचित बहुजन आघाडी आणि भाजपमध्ये आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, खोट्या बातम्या वाचून तुमचा संयम गमावू नका अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

पत्रात काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो,

तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा आणि पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे. येत्या शुक्रवारी, १९ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली-चिमूर येथील मतदार मतदान करून आपापले प्रतिनिधी निवडतील. या मतदारसंघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे.

आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागा वाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली.

आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची. हे केवळ आपले स्वप्न नाही; तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते; ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहित आहे की, तुम्ही सर्वजण हे 70 वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.

माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सत्याने सामना करा आणि तुमचा संयम गमावू नका. खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद आणि गर्व वाटला पाहिजे. आपण पराक्रमी नसतो, तर त्यांनी लुटलेला पैसा आणि वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का? नाही !

खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे. मीडिया आपल्यावर कुठल्याही प्रकारचे अफलातून आरोप लावेल. पण, तुमचा संयम गमावू नका. हे तेच माध्यम आहे जे मला हेलिकॉप्टरमधून प्रवास करतांना पाहिले तरी त्यांची झोप उडते पण, महायुती आणि महाविकास आघाडीकडे असणाऱ्या आणि येणाऱ्या पैशांच्या स्रोतांवर प्रश्न विचारणार नाहीत.

हा तोच मीडिया आहे जो, एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी का दिली नाही?, असा प्रश्न या पक्षांना ते विचारणार नाहीत. हा तोच मीडिया आहे जो, या पक्षांनी किती ओबीसी उमेदवारांना उमेदवारी दिली?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत. हा तोच मीडिया आहे जो, या पक्षांनी ओपन जागांवरून किती अनुसूचित जाती-जमातींना उमेदवारी दिली आहे?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत. हा तोच मीडिया आहे जो, मला आणि आपल्या पक्षाला संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी या पक्षांनी इतक्या वर्षात कशा पद्धतीने एकत्र येवून मिलीभगत कशी केली?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत. हा तोच मीडिया आहे जो, अकोल्यात काँग्रेसने आरएसएसच्या स्वयंसेवकाला उमेदवारी का दिली?, असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

माध्यमांचा आपल्यासोबत भेदभाव नवीन नाही. जेव्हा तुम्ही त्यांचे भेदभावपूर्ण विश्लेषण पाहता किंवा वाचता तेव्हा तुमचा संयम गमावू नका. त्यांना उत्तर देण्यासाठी संघटनेची शक्ती, सोशल मीडिया आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मताचा वापर करा.

अजून एक शेवटची विनंती आहे की, तुम्ही प्रचारासाठी बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या. पाण्याची बाटली आणि सोबत दुपट्टा ठेवा. तुम्ही पक्षाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.

ही लढाई आपण जिंकणारच !
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो !!!

हे ही वाचा:

Nitin Gadkari यांच्यासारखा भ्रष्टाचारी संपूर्ण महाराष्ट्रात नाही, Congress नेत्याचे गंभीर आरोप

Ajit Pawar सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, Rohit Pawar यांची टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss