Tuesday, May 21, 2024

Latest Posts

“नमस्कार,मी तुमची बारामती”; शरद पवार गटाकडून पत्राद्वारे विरोधीपक्षांवर आरोप

काल झालेल्या मतदानानंतर शरदचंद्र पवार गटाने 'एक्स'(X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून एक पत्र जारी केले आहे. या पत्रामध्ये ' मी तुमची बारामती' असा उल्लेख केला असून 'बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर 'बारामतीने' संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला पत्रप्रपंच' असा मथळा दिला आहे.

काल ७ मे रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) तिसरा टप्पा पार पडला. राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. या ११ मतदारसंघांपैकी बारामती हा एक महत्वाचा मतदारसंघ होता. यावर्षी बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार उभ्या होत्या. काल झालेल्या मतदानानंतर शरदचंद्र पवार गटाने ‘एक्स'(X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून एक पत्र जारी केले आहे. या पत्रामध्ये ‘ मी तुमची बारामती’ असा उल्लेख केला असून ‘बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर ‘बारामतीने’ संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला पत्रप्रपंच’ असा मथळा दिला आहे.

पत्रात काय आहे ? 

नमस्कार,
मी तुमची बारामती. या राज्याची एक भगिनी. माझ्या लोकसभा मतदारसंघाने आजपर्यंत अनेक निवडणूक पाहिल्यात. राजकीय स्थित्यंतर पाहिलीत. पण काल जे घडलं ते माझ्यासाठी फार वेदनादायी आणि नवीन होत. काल मी बारामती लोकसभा संघात इथल्या प्रतिभावान राजकीय परंपरेला छेद जाताना पाहिलंय. आजवरच्या या लोकशाहीच्या उत्सवात सगळेजण मिळून मिसळून सहभागी व्हायचे. राजकीय मतभेद जरी नसले तरी मतदान प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडत असे. परंतु काल मात्र आदर्श आचारसंहिता हि बासनात गुंडाळण्याचा काम सत्त्ताधारी पक्षाकडून करण्यात आलं. भारताच्या इतिहासात आतापर्यंत कधीच कुठलीही सहकारी बँक रात्रभर चालू नव्हती. पण मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या मतदारसंघातील वेल्हे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक रात्रभर चालू होती. ज्या बँकेवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं वर्चस्व आहे. पैशांनी भरलेल्या बॅगा, प्रचारपत्रके, मतदारयादी या सारखा बराच मुद्देमाल असलेली वाहने बारामती लोकसभा मतदारसंघातील असलेल्या अनेक गावांच्या खेडोपाड्यात फिरत होत्या. बंद खोल्यांमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री कार्यकर्त्यांकडून पैशांचं वाटप सुरु होत.

मतदार केंद्रावरही विरोधकांकडून दमदाटी सुरु होती. एक वेगळाच चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं, जे आजवर कधीही निदर्शनास आलं नाही. अहो इतकच काय तर सत्तारूढ पक्षातील आमदारांकडून तर त्यांच्या विरोधातील कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यात आली. धाय मोकलून हा कार्यकर्ता रडत होता, अशी ही परिस्थिती! आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूका भयमुक्त होत्या. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात दडपशाही कारभार पाहायला मिळाला.

बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण देशासाठी आजवर एक आदर्श होती. परंतु काही लोकांनी याठिकाणी पैशांचा पाट वाहून इथल्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा बिमोड करण्याचं काम केलं. परंतु लोकसभा मतदारसंघातील जनता सुजाण आहे. धनशक्तीला हि जनशक्ती भारी पडली. येत्या काही दिवसात अजून निवडणुकीचे टप्पे पार पडणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सुजाण जनतेचा हाच आदर्श येत्या काळात राज्यातील मतदार घेतील, हा विश्वास आहे म्हणून हा सगळं पत्रप्रपंच.

असे पत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून विरोधी पक्षावरती निशाणा साधला आहे. काल बारामतीमध्ये ४५.६४ टक्के इतके मतदान झाले असून राज्यातील सर्वात कमी मतदान बारामती येथे झाले आहे.

हे ही वाचा:

साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे , पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का?

दादा-ताईंच्या भेटीवर अमोल मिटकरींचा सवाल; ‘मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न’

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss