Tuesday, April 23, 2024

Latest Posts

अंध मतदारांच्या सोयीसाठी असणार Braille Voter Information Slip

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे लोकसभा निवडणूक २०२४ च्या तयारीबाबत माहिती देण्यासंदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी मतदारांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून याअंतर्गत अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देणार असल्याचे माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम् यांनी दिली.
चोक्कलिंगम् यांनी सांगितले की, राज्यातील एकुण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत अंदाजे १,१६,५१८ अंध मतदार आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक२०२४ च्या अंध मतदारांच्या सुलभतेसाठी त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी (Braille Voter Information Slip) उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने ४०% दिव्यांगत्व असलेले दिव्यांग व ८५ वयावरील ज्येष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना १२ डी अर्जान्वये गृह मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार राज्यभरातून २८ मार्च पर्यंत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यामध्ये १७ हजार ८५० मतदारांचे तसेच ४०% दिव्यांगत्व असलेले ५ हजार ४५३ दिव्यांग मतदारांचे १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा यामधील ५३ मतदारांचे २८ मार्च पर्यंत १२ डी चे अर्ज प्राप्त झाले आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांसाठी या निवडणूकीत १९०  अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. तसेच भारत निवडणूक आयोगाने राज्यामध्ये सहा राष्ट्रीय मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि चार राज्यस्तरीय मान्यता प्राप्त पक्ष यांना मान्यता दिली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक (Special General Observer)म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी धर्मेंद्र एस गंगवार व विशेष पोलिस निरिक्षक (Special Police Observer) म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी एन. के. मिश्रा यांची नियुक्ती केली आहे.  राज्यामध्ये या निवडणूकीसाठी ९८ हजार ११४ इतक्या मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ.किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, सह मुख्य निवडणूक अधिकारी  मनोहर पारकर, अवर सचिव  तथा उप निवडणूक अधिकारी शरद दळवी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss