Friday, April 19, 2024

Latest Posts

कोल्हापूरमध्ये सर्वाधिक दर देणाऱ्या साखर कारखान्याच्या होणार निवडणुका

उसाला पुरेसा दर दिला जात नसल्याच्या कारणावरून निवडणुकीचा रणसंग्राम जोमात असताना राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील ‘बिद्री’ कारखान्याच्या संचालक मंडळाला निवडणुकीचे आव्हान पेलावे लागणार आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा रणसंग्राम संपल्यानंतर आता कागल तालुक्यातील बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी गटाला आव्हान द्यायला सुरुवात झाली आहे. मागील निवडणुकीत विरोधी गटाचे नेतृत्व करणारे खासदार संजय मंडलिक यांनी ‘बिद्री’ व त्यांच्या हमीदवाडा मंडलिक कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी गटाचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी त्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

राधानगरी–भुदरगड तालुक्याचा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीच्या दृष्टीने ‘बिद्री’ची निवडणूक महत्त्वाची असल्याने त्याच्या राजकारणाची दिशा नेमकी कशी राहणार याची उत्सुकता आहे. बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना हा चार तालुक्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. भुदरगड, राधानगरी, कागल व करवीर या तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र आहे. कारखान्याचे ५५ हजार ऊस उत्पादक तर हजारावर संस्था सभासद आहेत. ६१ हजार सभासद असलेल्या या कारखान्याच्या मागील दोन निवडणुका जोरदार गाजल्या असल्याने यावेळी त्याला नेमके कसे वळण लागणार हे विविध घडामोडीमुळे लक्षवेधी बनले आहे.

या कारखान्याचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवून यश मिळवले. यावेळी कारखान्यांमध्ये भाजपच्या सहा संचालकांचा प्रवेश झाला. गेल्या पाच वर्षांमध्ये बिद्री साखर कारखान्याने उच्चांक इतर दिला आहे. यावर्षीच्या हंगामात प्रतिटन ३२०९ रुपये देवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान करतानाच के. पी. पाटील यांनी बिद्रीच्या मतपेढीची चांगली बांधणी केली आहे. त्याला शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आक्षेप घेत कारखान्याचा उतारा अधिक असल्याने एफआरपीपेक्षा अधिक रक्कम देण्यात पाटील अपयशी ठरले असल्याचा आरोप करून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र आजवर बिद्रीत त्यांची डाळ शिजली नसल्याचे इतिहास सांगतो.

हे ही वाचा : 

नवनीत राणांविरोधात लोकसभेची जागा जिंकण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती

उद्धव ठाकरे हिंसाचाराच्या घटना घडवत आहेत, आमदार संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss