Thursday, February 29, 2024

Latest Posts

Mumbai च्या रक्षणासाठी धारावीकर मैदानात

शिस्तीने चालणारे नागरिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त, भर उन्हात चालणाऱ्या महिला, भगवे झेंडे, भगव्या टोप्या, कोणासोबत लहान मुलं आहेत त

शिस्तीने चालणारे नागरिक, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, भर उन्हात चालणाऱ्या महिला, भगवे झेंडे, भगव्या टोप्या, कोणासोबत लहान मुलं आहेत तर कोणी काठी टेकत का होईना पण चालतंय, कोणी नारा देतंय तर कोणी जयघोष करतंय, हे सर्व वातावरण मुंबईतील धारावी टी जंक्शन ते बीकेसी फटाका मैदान येथे पाहायला मिळालं.

एरव्ही बसण्यासाठी स्वच्छ जागेचा आग्रह धरणारी मंडळी आज मात्र भर उन्हात तापलेल्या रस्त्यावर बसलेली पाहायला मिळाली. ही मंडळी एकाच आवाजासाठी एकाच मागणीसाठी जमली होती. आणि तो आवाज म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. धारावी प्रकल्पाविरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आज सर्वांनाच पाहायला मिळाला. धारावी परिसरात ठिकठिकाणी ठाकरे गटाने बॅनरबाजी केली होती. पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आढावा घेतला जात होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. धारावी टी जंक्शन पासून मोर्चाला सुरूवात झाली. त्यानंतर कलानगर जंक्शनच्या आधीच उजव्या बाजूने हा मोर्चा बीकेसीकडे गेला. नंतर सीएनजी पेट्रोल पंपापासून परिमंडळ 8 जवळून हा मोर्चा पुढे फटाका मैदान येथे थांबला.

फटाका मैदान धारावी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, सदा परब, आमदार आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच ठाकरे गटाचे इतर कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. ‘मुंबई आपल्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, असा नारा देत प्रत्येक धारावीकर मैदानात उतरलेला आज पाहायला मिळाला. आमच्या हक्काची घरं आम्ही अदानीच्या घशात कशी जाऊ देणार? असा सवाल यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.

आम आदमी पक्षाचे काही कार्यकर्ते, कोळी बांधव, शिवसैनिक, काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना साथ देणारी तरुणाई आणि महिला वर्ग, हिंदी भाषिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आपल्या मागण्या उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून पूर्ण केल्या जातील असा आशावाद मनात ठेवून अनेक जण या ठिकाणी भर उन्हात हजर राहिले होते. धारावीतील सर्व निवासी अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून त्यांचे धारावीतच पुनर्वसन करा. निवासी झोपडपट्टी धारकांना ५०० चौरस फुटाचे घर मोफत द्या ‘टीडीआर’ साठी सरकारने स्वतःची कंपनी नेमावी. पालिका मालमत्ता विभागाच्या चाळी व इमारतीमधील रहिवाशांना ७५० चौरस फुटाचे घर मोफत द्या, नव्यानं सर्वेक्षण करा. निवासी अनिवासी जाहीर केल्यानंतरच प्रकल्प सुरू करावा. प्रकल्पाचे स्वरूप समजावण्यासाठी मास्टर प्लॅन आधी जाहीर करून सविस्तर माहिती द्या. शाहूनगर लेबर कॅम्प मधील रहिवाशांना ७५० चौरस फुटांची घरे द्या. अदानी हा विश्वासार्ह विकासक नसल्याची जनभावना असल्याने म्हाडा, सिडको प्राधिकरणाकडून बीडीच्या धरतीवर पुनर्विकास करा.अशा मागण्या पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न व्हावेत यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

कोरोनाशी लढून जिंकलेली धारावी अदानीला शरण जाईल का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच टाळ्यांचा आणि घोषणांचा एकच जयजयकार पाहायला मिळाला. मोर्चाच्या दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शिंदे गटावर टीकास्त्र उगारल्याचेही पाहायला मिळाले.

Latest Posts

Don't Miss