Saturday, July 27, 2024

Latest Posts

 गौतम नवलखा यांना नक्षलवाद प्रकरणी जामीन मंजूर झाला 

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे

शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यांना एक लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. या जामीनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याकरीता ६ आठवडे स्थगितीची NIA ने मागणी केली आहे. मात्र उच्च न्यायालयाने ही मागणी अंशतः मान्य करून अंमलबजावणीसाठी तीन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांच्या खंडपीठाने शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांच्या जामीनाचा आदेश दिला.

या आधी जामीन फेटाळला होता
शहरी नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले विचारवंत गौतम नवलखा यांचे माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोप एनआयएने केला आहे. या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य असल्याचे पुरावे आहेत असं निरीक्षण या आधी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टानं नोंदवून त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नवलखा यांना नवी मुंबईतील घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.

नवलखा यांनी नियमित जामीनासाठी केलेला अर्ज विशेष एनआयए कोर्टानं नामंजूर केला होता. त्याला नवलखा यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. यावर पुन्हा सुनावणी घेत तातडीनं निकाल देण्याचे आदेश हायकोर्टानं एनआयए कोर्टाला दिले होते. त्यानुसार एनआयए कोर्टानं यावर नव्यानं सुनावणी घेत नवलखा यांचा जामीन पुन्हा फेटाळून लावला होता.

नवलखांचे माओवाद्यांशी संबंध
नवलखा हे बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे सदस्य होते असं निरीक्षण न्यायालयाने या आधी व्यक्त केलं होतं. देशासाठी लढणाऱ्या अनेक संरक्षक जवानांना या संघटनेनं ठार मारलेलं आहे. तपासयंत्रणेनं याबाबत दाखल केलेल्या आरोपपत्रातील कागदपत्रांवरुन नवलखा या संघटनेचे सक्रिय सदस्य होते असं दिसतंय. नवलखा यांच्याकडून अनेक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. आरोपपत्रात असलेल्या कागदपत्रांवरुन स्पष्ट होतंय की, नवलखा हे या गुन्ह्यात आणि कटकारस्थानातही सहभागी होते. याशिवाय अन्य आरोपींप्रमाणे ते शस्त्रास्त्र प्रशिक्षणातही सामील होते असं निरिक्षणही कोर्टानं नोंदवलं होतं.

काश्मिर मुक्त संघटनेचा सय्यद गुलाम नबी फई याच्यासोबत नवलखा यांचे संबंध असल्याचा आरोपही एनआयएनं केला आहे.

नजरकैदेत असताना नवलाखा यांना इंटरनेट, मोबाईल फोन, लॅपटॉप, आयपॅड किंवा इतर कोणतंही संपर्काचं साधन वापरण्यास सर्वोच्च न्यायालयानं मनाई केली होती. आरोपी नवलाखा यांना दिवसातून एकदाच १० मिनिटांसाठी सुरक्षा रक्षकांनी दिलेला फोन वापरण्यास परवानगी होती.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss