खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची यात्रा सुरु असून या न्याय यात्रेत महिला सक्षमिकरणाच्या मुद्द्यावरही भर देण्यात आला आहे. महिला आरक्षण, महागाई, अत्याचारासह महत्वाच्या प्रश्नांचा उहापोह करत न्याय यात्रेत पाच मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना ५० टक्के आरक्षण दिले जाईल. न्याय यात्रेत महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सुरक्षा या पाच मुद्द्यांचा समावेश केला आहे, अशी माहिती महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी दिली आहे.
टिळक भवनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, महागाईने महिला त्रस्त आहेत, त्यामुळे गॅसच्या किमतीसह इतर वस्तुंच्या किमतीही कमी कराव्यात, समान काम, समान वेतन, आरोग्य केंद्रातील दुरवस्था सुधारणे,पाच किमी परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह, मोफत शिक्षण, महिला सुरक्षा या प्रश्नावर न्याय देण्याचा भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. भाजपाच्या राज्यात महिला अत्याचार वाढले आहेत, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा ठोठावण्याऐवजी त्यांना अभय दिले जात आहे हे बिल्कीस बानो, महिला खेळाडूंवर अत्याचार करणाऱ्या भाजपा खासदाराला मोकाट सोडणे यातून दिसून आले आहे. राज्यातही महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरात घूसून मुलीची छेड काढण्यात आली, मुलींना शाळेत जाणेही सुरक्षित राहिले नाही.काँग्रेसने महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणातील त्यांचा सहभाग वाढवला परंतु भाजपाने जाहीर केलेले महिला आरक्षण फसवे आहे, ते कधी लागू होईल हे सांगता येत नाही. महिलांचे प्रश्न घेऊन महिला काँग्रेस ‘नारी न्याय, हैं तयार हम’ चा नारा देत मैदानात उतरली आहे, असेही सव्वालाखे यांनी सांगितले.
तर या पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ईडीच्या माध्यमातून विरोधी पक्षांच्या लोकांना नाहक त्रास देत असल्याचे दररोज दिसत आहे परंतु ईडीच्या नावाखाली ब्लॅकमेल करुन फसवण्याचे उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ईडी कोणाच्या घरी छापे मारणार हे आधीच जाहीर करणारे भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने ईडीच्या छाप्यांबद्दल सांगत असतात. ईडीच्या नावावर लोकांना ब्लॅकमेल करुन वसुली करणारे सोमय्या किंवा इतरही कोणी आहेत का? याची चौकशी केली पाहिजे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाची भिती दाखवून १६४ कोटी रुपयांची खंडणी उकळणारा व्यक्ती कोण आहे? याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
एका प्रश्नाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी १० वर्षे केवळ पंडित नेहरू व काँग्रेस पक्षाला शिव्या देण्यातच घालवली. पंडित नेहरुंनी उभ्या केलेल्या संस्था विकून देश चालवणाऱ्या मोंदीनी १० वर्षात काय काम केले हे ते सांगू शकत नाहीत. २०१४ पासून फक्त लुटमार सुरु आहे, नरेंद्र मोदींनी दिलेले एकदी वचन पूर्ण केलेले नाही. आता ते राहुल गांधींवर टीका करत असतात, शत्रू पक्षाला जसे धनाजी संताजी दिसत तसेच नरेंद्र मोदींना सारखे राहुल गांधीच दिसतात, अशी त्यांची अवस्था झाली आहे. १० वर्षातील मोदी सरकार वर्णन करताना ‘मोदी = जुमला = फसवणूक’ असेच म्हणावे लागेल, लोंढे म्हणाले.
हे ही वाचा:
पॅराग्लायडिंगच्या निसर्गसंपन्न पंढरीमध्ये रंगणार ‘टाइम महाराष्ट्र’चे महापॅराग्लायडिंग
Raj Thackeray Live: काळाराम मंदिरात दर्शनाला जाणार, नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेतील अक्षरा समोर आलं भुवनेश्वरीच सत्य