नवी मुंबईत भरलेल्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो. ह्या जूनमध्ये मला अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या संमेलनाला आमंत्रित केलं आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष मला भेटले. ते मला म्हणाले की, अमेरिकेत आम्ही शंभरहून अधिक मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होणं हे काय कमी आहे का? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
माझी दीपक केसरकारांना विनंती आहे की ह्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे. माझी शासनाकडे इतकीच विनंती आहे की, इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत मराठी विषय हा अनिवार्य करा. जो समोर येईल, त्याच्याशी मराठीत बोला, हेच माझं प्रत्येकाला सांगणं आहे. सर्व शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची विनंती राज ठाकरे यांनी करताच शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली की, या वर्षापासून मराठी विषयाला प्राधान्य देऊन अनिवार्य करण्यात आले आहे, तसेच इंजिरियरींगचे विषय सुद्धा मराठीत करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माहिती देताच, राज ठाकरे यांनी कौतुक करत, फक्त शिक्षक चांगले ठेवा, म्हणजे पुढे प्रॉब्लेम व्हायला नको, असे म्हटले. त्यानंतर प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट संमेलनात पाहायला मिळाला.
मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे
मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे उद्घाटनाच्यावेळी काढले.
हे ही वाचा:
‘निव्वळ निवडणुकांसाठीचे हे गाजर’…आरक्षण मिळाल्यानंतर किरण मानेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी
‘मराठा लढतो तेव्हा इतिहास घडतोच’…आरक्षण मिळाल्यानंतर प्राजक्ता गायकवाडची खास पोस्ट