Saturday, July 27, 2024

Latest Posts

आता उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही – CM EKNATH SHINDE

राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देताना ठाणे, मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू आहे.

उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्यातील जनतेला उत्तम प्रकारच्या आरोग्य सोयी सुविधा देण्यासाठी हे शासन कटिबद्ध असून प्रत्येक जिल्हा सामान्य रुग्णालय हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सुपर स्पेशालिटी रुग्णालय ही काळाची गरज आहे. ही गरज ओळखून हे शासन नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ठाणे जिल्ह्यातून कॅशलेस सेवा देणारे पहिले रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यानंतर आता हे उल्हासनगर महानगरपालिकेचे कॅशलेस सेवा देणारे दुसरे सुपर स्पेशालिटी रुग्णालय. अशाच प्रकारे काही दिवसातच मीरा-भाईंदर येथेही कॅशलेस सेवा देणारे सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहोत. रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला पैशांची चिंता भेडसावते. मात्र आता शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती ही दीड लाखाहून पाच लाखावर आणली आहे. त्यामुळे आता कोणालाही आपल्या रुग्णाच्या उपचारांसाठी होणाऱ्या खर्चाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. शासनाकडून पाच लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य करून देण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यावर भर देताना ठाणे, मुंब्रा येथे कॅन्सर हॉस्पिटलचे काम सुरू आहे. त्याचबरोबर एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून चार हजार कोटी रुपयांची मदत राज्य शासनाला मिळणार असून त्यातून आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्य शासन आरोग्य व्यवस्था अधिकाधिक उत्तम दर्जाची करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तरी शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, डॉक्टरांनी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार कुमार आयलानी,आमदार डॉ.बालाजी किणीकर,प्रशासक तथा आयुक्त अजीज शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा: 

पॅराग्लायडिंगच्या पंढरीत रंगणार साहसी क्रीडाप्रकाराचा मेळा

छोट्या पडद्यावरील‘आई कुठे काय करते’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप ? चर्चा सुरु

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss