आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी डोंबिवलीतील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या मुख्य कार्यालयास भेट देऊन विविध जबाबदा-या पार पाडणा-या अधिकारी तसेच कर्मचारी वर्गाशी संवाद साधला. यासोबतच, उपस्थित अधिका-यांना निवडणूकीशी निगडीत प्रश्न विचारत त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करीत असतानाच निवडणूकीशी निगडीत विविध विषयांचा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे (Ashok Shingare) आढावा घेतला.
क्षेत्रिय अधिका-यांनी (Zonal Officer) निवडणूकीच्या दिवसांपूर्वी म्हणजेच मतदानापूर्वी संबंधित ठिकाणी पुरेसे फर्निचर, लाईट व्यवस्था, पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प इ. सुविधा व्यवस्थित असल्याची खातरजमा करण्याच्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. तसेच त्यांनी अधिकारी वर्गाचा आढावा घेतल्यानंतर झालेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त केले. निवडणूक कर्तव्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी महानगरपालिका व पूर्ण जिल्हा प्रशासन आपल्या सोबत राहील, असे सांगत सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गास निवडणूक कामासाठी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मी मतदानाचा हक्क बजावणार’ या स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदवला.
यावेळी २४-कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली लंभाते, १४४-कल्याण ग्रामीण मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर, २४-कल्याण लोकसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी मंगेश चितळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे ही वाचा:
महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, दिल्लीत आज महत्वाची बैठक
कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया