काही दिवसांपूर्वी दोन तरुणांनी संसदेच्या सभागृहात शिरून धुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकारामुळे संसदेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून संबंधित प्रकरणावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षांच्या खासदारांकडून करण्यात येत आहे. यासाठी विरोधकांनी संसदेच्या सभागृहात फलक घेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे विविध विरोधी पक्षांच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या ७८ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. एकाच दिवशी इतक्या खासदारांना निलंबित केल्याने हा आकडा आता ९२ वर पोहोचला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकार हे भारताच्या इतिहासातील सर्वात डरपोक सरकार आहे. लोकप्रतिनिधींची तोंडं बंद केली जात आहेत. पण सामान्य नागरिकांनीही याविषयी वेळीच आवाज उठवला नाही, तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे, एक्सवर (पूर्वीचं ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये आमदार आव्हाड म्हणाले, “मोदी सरकार हे भारताच्या इतिहासातील सर्वात डरपोक सरकार आहे.
एका दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण ७८ खासदारांना निलंबित करून भारताच्या इतिहासातील हे सर्वात ‘डरपोक सरकार’ असल्याचं मोदी सरकारने स्वत: सिद्ध केलं आहे. संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा असतानाही पंतप्रधान आणि गृहमंत्री त्यावर संसदेत निवेदन देत नाहीत, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याउलट निवेदनाची मागणी करणाऱ्या खासदारांचं निलंबन करतात हा खरंतर लोकशाहीचा अपमान आहे.” “बहुमत असूनही पत्रकार परिषद न घेणारं, विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करणारं, महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा घडवून न आणणारं हे ‘डरपोक सरकार’ आहे. लोकप्रतिनिधींची तोंडं बंद केली जात आहेतच, पण सामान्य नागरिकांनीही याविषयी वेळीच आवाज उठवला नाही, तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. मोदी सरकारचा जाहीर निषेध,” अशा तीव्र शब्दांत आव्हाडांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
“संपूर्ण विश्वातील सर्वात महान मनुष्य,रितेशच्या वाढदिवसानिमित्त जेनेलियाची खास पोस्ट