spot_img
Sunday, February 11, 2024
spot_img

Latest Posts

Exclusive, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चक्रव्यूह कधी भेदणार?

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकत अत्यंत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजप विरोधात शड्डू ठोकण्यासाठी काँग्रेस हा दमदार पर्याय असल्याचं देशभरात चर्चिलं जात आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १३६ जागा जिंकत अत्यंत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजप विरोधात शड्डू ठोकण्यासाठी काँग्रेस हा दमदार पर्याय असल्याचं देशभरात चर्चिलं जात आहे. कर्नाटकातील विजयानंतर देशातील इतर ठिकाणीही भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होऊ शकेल असं अनेकांना वाटतंय.त्यामुळे राज्यातील अग्रगण्य असलेल्या ‘लोकसत्ता’ या दैनिकाने याबाबतचा एक जनमताचा कौल घेणारा सर्वे केला आणि त्यातून वेगळीच माहिती समोर आली आहे. या सर्व्हेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या युती सरकारच्या बाजूने जनतेने कौल दिला असला तरी मुख्यमंत्र्यां भोवतीच्या अतृप्त मंडळींच्या चक्रव्यूहातच एकनाथ शिंदे बहुतेक वेळा अडकून पडतात असं दिसून आलेलं आहे. त्यामुळे प्रशासकीय कामांपासून ते अगदी आपण केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यापर्यंत मुख्यमंत्र्यांना अडचणी येत आहेत. याच अडचणींमुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनात सहकार्य करणारे अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे हितचिंतक काळजीत आहेत.

कर्नाटकच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वा खालील शिवसेना यांना महाराष्ट्रात यश मिळेल का? असा प्रश्न ‘लोकसत्ता’ने आपल्या पाहणीत विचारला होता. त्याला ७२ टक्के लोकांनी युतीला फायदा होईल असं मत नोंदवलं आहे. तर महाविकास आघाडीला फायदा होईल असं २२ टक्के नागरिकांचे मत आहे.याचाच अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनता समाधानी असल्याचं दिसत आहे. मात्र सर्व्हेतून लोकांनी दाखवलेला विश्वास जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री आणि त्यांची यंत्रणा कमी पडत असल्याच स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या गटाला जनतेची सहानुभूती असल्याचं राजकीय विश्लेषक, माध्यमकर्मी आणि वाहिन्यांवर बोलणाऱ्या पाहुणे मंडळींकडून दावे केले जात आहेत.प्रत्यक्षात याला मुख्यमंत्र्यांच्या भोवती असलेलं आमदारांचं आणि खुषमस्क-यांच कोंडाळं जबाबदार असल्याचं लक्षात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री असताना जितकं काम करत होते त्यापेक्षा अधिक काम सध्या करत आहेत. मात्र शिवसेनेमध्ये उठाव करत ४० आमदारांना घेऊन भाजपबरोबर सत्ता बनवल्यानंतर याच ४० आमदारांच्या कोंडाळ्यातून बाहेर पडायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाहीये. या ४० पैकी २० ते २२ आमदार सतत मुख्यमंत्र्यांच्या भवती बहुतेक वेळा घेरा टाकून बसलेले असतात. प्रशासकीय शिस्त, राजशिष्टाचार आणि गोपनीयता यांचे पूर्णपणे तीन तेरा वाजलेले आपल्याला मंत्रालयाचा सहावा मजला, वर्षा बंगला आणि सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी पाहायला मिळत. सुरुवातीच्या काळात आमदार नाराज होऊ नये म्हणून मुख्यमंत्री शिंदे हे देखील सतत या आमदारांची मर्जी राखण्यामध्येच आपला वेळ व्यतीत करत होते. दहा महिने उलटून गेले तरी परिस्थिती फारशी बदलत नसल्याचं लक्षात आलेलं आहे. या समर्थक आमदारांचे उदकभरण अजूनही झालं नसल्याचाच लक्षात येत आहे इतर आमदार अशा स्वरूपाची दबक्या आवाजातली टीकाही करू लागले आहेत विशिष्ट आमदारांचीच काम करणं आणि त्यांच्या घराण्यात राहणं याची खूप मोठी किंमत देवेंद्र फडणवीस यांनी चुकवली आहे फडणवीस हेच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रवासापर्यंतचे खरे कलाकार असल्याचं त्यांनी स्वतःच म्हटलं आहे त्यामुळे त्यांच्या चुकांमधून शिंदे बोध घेतील तर त्यांचा व्यक्तिशः आणि राज्याचाही फायदा होऊ शकतो असं ज्येष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याइतकी घट्ट प्रशासकीय मांड गेल्या ३० वर्षात कोणत्याच मुख्यमंत्र्याला बसवता आलेली नाही. मुख्यमंत्री म्हणून यशाचं जर सूत्रं आपण पाहायचा विचार केला तर फायलींचा निपटारा, धोरणात्मक कामांसाठीच्या बैठका, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रकल्प पुढे नेण्यासाठी करावी लागणारी विकास कामांसाठीची उजळणी इत्यादी गोष्टींकरता मुख्यमंत्र्यांना वेळ कमी पडत असल्याचं लक्षात येत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारले जाणारे लहान- लहान कार्यक्रम आणि त्यासाठी खर्च होणारा वेळ, शिंदे समर्थक आमदारांकडून केल्या जाणाऱ्या कार्यक्रमासाठीची उपस्थिती यात मुख्यमंत्री पुरते अडकून गेले आहेत. वेळेचे ढिसाळ नियोजन आणि समन्वयाचा अभाव याचा खूप मोठा परिणाम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर झालेला आहे. त्यामुळे सरकारकडून घेतलेले निर्णय, भाजप सेना युतीने केलेलं काम हे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवक्ते किंवा पक्षातील नेते हे विशेष लक्ष पुरवत नसल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांचा गट आणि ठाकरेंवरची टीका हेच प्रवक्त्यांचं काम असल्याची समजूत शिंदेंकडच्या काही नेते मंडळींनी करून घेतली आहे. मुख्यमंत्री शिंदेंवर होणाऱ्या टीकेचा समाचार प्रवक्त्यांकडून घेतला जायला हवा हे जरी खरं असलं तरी त्याचवेळी शिंदे किती सकारात्मक राज्यकारभार चालवतायेत हे देखील अधोरेखित करणे गरजेचे आहे. मात्र ते एखादा दुसरा अपवाद वगळला तर नेत्यांना आणि प्रवक्त्यांना जमलेलं नाही.

एकनाथ शिंदेंचा अपवाद सोडला तर त्यांच्याकडे असलेले मंत्री हे फारसे प्रभाव पाडू शकलेले नाहीत. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असताना मंत्री संजय राठोड यांना अनेक वेळा मदत करत सांभाळून घेतले होते. मात्र मागच्या जुन्या चुकांमधून राठोड काहीच नवीन शिकल्याचं दिसून येत नाही. त्यांच्या विरोधात झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दिवसागणिक नव्या स्वरूपात आणि अधिक ठळक स्वरूपात समोर येत आहेत. दीपक केसरकर हे प्रसारमाध्यमांना नीट सामोरे जातात अशी मुख्यमंत्री शिंदे यांची समजूत आहे. मात्र मुद्दा सोडून पसरट बोलणं आणि एकच मुद्दा गोलगोल फिरवून ‘टाॅकटाइम’ वाया घालवणं याच्यामुळे केसरकर हे जरी शिंदेंना समाधानकारक वाटत असले तरी माध्यमांसमोर त्यांची बाजू मांडणं आणि त्यांच्याकडे असलेल्या मंत्रालयाचा कारभार चालवणं हे केसरकरांना जमलेलं नाही. तीच गोष्ट दादा भुसे यांच्याबाबतीतही म्हणता येईल. त्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी संजय राठोड, दादा भुसे, दीपक केसरकर यांना नारळ देणं ही शिंदेंसाठी एक महत्त्वाची कामगिरी होऊन राहणार आहे. अन्यथा येणाऱ्या काळात मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर गेलेल्या ४० आमदारांच्या गराड्यात इतके अडकून पडलेले असतात की प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून फाईल आणि विषय समजून घेणे यासाठीही त्यांना वेळ काढणं मुश्किल झालं आहे. हे आमदार एकाच वेळी गठ्ठगठ्यानं वीस पंचवीस पत्रांवर मुख्यमंत्र्यांची सही मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. आणि मुख्यमंत्री ही शक्य होईल तिथे उभे राहून या पत्रावर सह्या करत असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून नजरचुकीने अडचणीत येऊ शकणाऱ्या पत्रावर सही केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी भीती ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. काही महिला आमदारांच्या मागण्यांची यादी संपता संपतच नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता फक्त त्या चाळीस आमदारांचेच नेते राहिलेले नाहीत तर त्या व्यतिरिक्त आमदारांचे पाठबळ वाढविण्यासाठी त्यांना अनेक आमदारांकडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र या चाळीस आमदारांपैकी बहुसंख्य आमदार हे शिंदे जणू काही आपल्यामुळेच बसले आहेत अशा अविर्भावात वागत असल्यामुळे आणि अधिका-यांशी उर्मटपणे बोलत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. तर काही आमदार आपल्या एकेका विषयासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका लावण्याची सूचना थेट प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना करत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांचा वेळ वाया जाऊन त्याचा परिणाम हा प्रशासनावर होत आहे.

• माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख हे दोघेही फाईली हाता निराळ्या करण्यासाठी दिवसाचे काही तास राखून ठेवत होते तर मुख्यमंत्री म्हणून यशस्वी ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी आठवड्यातला एक दिवस ‘फाईल डे’ म्हणून राखीव केलेला होता. या दिवशी फडणवीस सनदी अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही भेटत नसत हीच गोष्ट आता एकनाथ शिंदे यांना कटाक्षाने करावी लागणार आहे. अशी गरज एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याने बोलून दाखवली.

• माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नव्हते ही गोष्ट जरी खरी असली तरी एकनाथ शिंदे हे जनसामान्यांचे आहेत हे दाखवण्याच्या प्रयत्नात मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्ती असलेली काही मंडळी गर्दी जमवून ठेवण्यामध्येच रुची बाळगतात.  त्यामुळे ज्यांची कामे मार्गी लागली आहेत अशी मंडळी ही मुख्यमंत्र्यांभोवती कोंडाळे करून थांबलेली असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नासह प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणींमध्येही भर पडत आहे.

• मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १७-१८ तास काम करत असताना जमिनीवर त्यांचा जनाधार वाढवण्याकडे त्यांच्या सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कल दिसत नाही. आपल्या मर्जीतीलच ठाकरें कडील टाकाऊ मंडळींना जमा करण्याकडेच शिंदेंच्या काही सहकाऱ्यांचा ओढा आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ही समस्या अधिक त्रासदायक ठरू शकते अशी भिती एका ज्येष्ठ आमदाराने बोलून दाखवली.

• स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी विक्रमी काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान मिळवला. सरपंच ते केंद्रीय मंत्री या त्यांच्या पल्लेदार कामगिरीमध्ये त्यांचे चिरंजीव अमित देशमुख यांचा विशेष वाटा होता. पडद्याआडून आपल्या वडिलांना मदत करणाऱ्या अमित देशमुख यांच्याप्रमाणेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मोठी खेळी नजीकच्या काळात करावी लागणार आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे राज्यातील तरुण आणि कार्यक्षम खासदार असल्यामुळे त्यांच्या मतदार संघातील आव्हानांचाही त्यांना त्याचवेळी सामना करायचा आहे. अर्थात त्यासाठी डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खासदार श्रीकांत शिंदे यांना आपल्या वडिलांच्या भोवती निर्माण झालेलं चक्रव्यूह भेदावं लागणार आहे. ते करण्यात यश मिळालं तरच ‘लोकसत्ता’ मधून मिळालेला जनमताचा कौल वास्तवात येण्यास मदत होऊ शकेल असं राजकीय समीक्षकांना वाटतंय.

राजेश कोचरेकर, संपादक टाईम महाराष्ट्र

हे ही वाचा : 

Mrs Asia GB सिझन एकची फायनलिस्ट मराठमोळी इन्फ्लुएंसर ‘द केरला स्टोरी’ च्या निर्मात्यांचं जगाला रोखठोक उत्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss