Sunday, May 12, 2024

Latest Posts

भविष्यातील विजयाचं रणशिंग रायगडावरून फुंकलं जाणार- जयंत पाटील

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे, त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब फुंकणार आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अभूतपूर्व बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सातत्याने चर्चेत असतात. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळाले. तर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्यांच्या या चिन्हाचे अनावरण आज रायगडावर झाले. यावेळी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे आभार मानले पाहिजे, त्यांनी आम्हाला तुतारी हे चिन्ह दिले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब फुंकणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना दिली, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो. आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलूखामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.असे जयंत पाटील म्हणाले. पुढे जयंत पाटील म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची. त्याचबरोबर प्रत्येकवेळी विजयी होऊन त्यांचं राजधानीत पुनरागमन व्हायचं. त्यावेळी देखील त्यांचे तुतारीनेच स्वागत व्हायचं. हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कर्म-धर्म-संयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह निवडणूक आयोगाने काही कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून ‘तुतारी’ हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवले. निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल सर्व तमाम मराठी मुलूखाला आनंद झाला आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून परंपरा सांगणारे, आमचा तुतारी वाजवणाऱ्या पुरुषात असणारा माणूस आज पवार साहेबांचे चिन्ह होणार आहे. या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकांकरिता हे चिन्ह भविष्यकाळात वापरले जाईल, असा आम्हाला विश्वास आहे. त्याची सुरुवात म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण रायगड किल्ल्यावरून करण्यात येत आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

तर यावेळी बोलत असताना अमोल कोल्हे म्हणाले की, महाराष्ट्राच्या काळजातील तुतारी आता राज्याची स्वाभिमानाची ललकारी होईल. शरद पवार यांच्या नेतृत्वात प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकारी महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम बुलंद राहण्यासाठी प्रयत्नशील राहील असे खासदार अमोल कोल्हे यावेळी म्हणाले. सेना जेव्हा युद्धाला निघत असते, त्यावेळेस वाजवलं जाणारं वाद्य म्हणजे तुतारी आहे आणि आपण जिंकल्यानंतर युद्धावरून जेव्हा परत येतो तेव्हादेखील तुतारीचं वाजवली जात असते. निवडणुकीच्या युद्धात उतरत असताना ८४ वर्षाच्या आमच्या योद्धाला तुतारी हातात देऊन निवडणूक आयोगाने शुभ संकेत दिल्याचा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा:

गौरी खानचं नव्या क्षेत्रात पदार्पण,सुरु केलं मुंबईत स्वतःचं पहिलं रेस्टॉरंट

विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी Amit Thackeray यांचा धडक मोर्चा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss