Thursday, July 25, 2024

Latest Posts

लग्नात रुखवत का बरं ठेवतात तुम्हाला माहिती आहे का ?

लग्नसराईचे दिवस सुरु होताच शॉपिंगसाठी मुंबईच्या बाजारात गर्दी लोटली आहे. लग्नाचे दागिने, कपडे, भेटवस्तू या सर्व खरेदीसोबतच नवरीला सासरी पाठवताना रुखवत देण्याचीही प्रथा आहे.

लग्नसराईचे दिवस सुरु होताच शॉपिंगसाठी मुंबईच्या बाजारात गर्दी लोटली आहे. लग्नाचे दागिने, कपडे, भेटवस्तू या सर्व खरेदीसोबतच नवरीला सासरी पाठवताना रुखवत देण्याचीही प्रथा आहे. लग्नाच्या मंडपात एका बाजूला हे रुखवत मांडलेलं असतं. या वस्तूंमध्ये गृह सजावटीच्या वस्तू ,गृहोपयोगी वस्तू ,काही खाद्य पदार्थ सजवून ठेवलेले असतात. घर सजावटीच्या आणि वापरातील वस्तूंचा संग्रह म्हणजे रुखवत. रुखवत हे नवरीला माहेरच्या मंडळींकडून दिले जाते. लग्नानंतर हे रुखवत नवरी मुलगी सासरी घेऊन जाते.

रुखवत म्हणजे काय?

रुखवत हा शब्द रुखसत आणि वतन या दोन शब्दांपासून बनलेला आहे. रूखसत म्हणजे विदाई, निरोप घेणे, दूर जाणे आणि वतन म्हणजे आपला देश किंवा प्रदेश. लग्न झाल्यावर मुलगी आपला प्रदेश सोडून जाते. रुखसतच्या वेळी मुलीला आपल्या वतनातील काही खास गोष्टी तिच्या सोबत दिल्या जात. त्या खास वस्तूंना रुखवत असे म्हणतात.

रुखवत का दिलं जातं?

पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे मुलगी लग्न होऊन सासरी गेली की माहेरच्या लोकांशी मुलीचा संपर्क क्वचितच व्हायचा. आपली आठवण मुलीला राहावी या उद्देशानं मुलीच्या मावश्या,आत्या,काकी, बहीणी आणि मैत्रिणी एकत्र बसून काही विशेष वस्तू आपल्या हाताने बनवून देत असे.

या वस्तूंशी मुलीचे भावनिक नाते जोडलेले असायचे. बारा महिने खराब न होणारे खाद्य पदार्थ सुद्धा रुखवतात बनवून दिले जातात. कुरडया,पापड्या,सांडगे,शेवया तसंच त्या प्रदेशातील काही खास वस्तूंचा रुखवतामध्ये समावेश असतो.

सध्याच्या काळात मुलगी कितीही दूर असली तरी सुद्धा तंत्रज्ञानामुळे ती सर्वांशी जोडलेलीच राहते. त्यामुळे रुखवताची प्रथा कमी झाली असली तरी नाहीशी झालेली नाही. वेळेच्या अभावामुळे आता तयार वस्तूंवर भर दिला जातो. तिला अनेक वर्ष टिकतील अश्या गृहोपयोगी वस्तू , इलेक्ट्रॅानिक साधने दिली जातात.

रुखवतात दिल्या जाणाऱ्या वस्तू

बैलगाडी,डोली,सप्तपदी,सौभाग्य अलंकार, आईचा निरोप लिहिलेली कार्डशीटस्, तुळशी वृंदावन, सजवाट केलेले कलश,सजवलेली पान-सुपारी, कृष्णाची हंडी, विणलेला ताटावरील रुमाल, विणलेले तोरण, विणलेला झूला, विणलेला आरसा, विणलेल्या बाहुल्या, विणलेला गणपती, सजविलेले घर, आईस्क्रीम काड्यांची होडी, रंगीत शेवया, झुंबर, लटकन, डिझायनर तोरण,सनई-चौघडा,नवरा-नवरी,सुपारीचे भटजी, विहिण पंगत,गौरीहार,जातं,पाटा-वरवंटा,उखळ,भातुकली,फुलदाणी, फळे या गोष्टी साधारण कोणत्याही रुखवतामध्ये असतात. या सर्व गोष्टी आता बजारपेठेत तयार मिळतात. या वर्षी सुद्धा बाजारात अनेक नवनवीन गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss