Sunday, April 28, 2024

Latest Posts

सावरकरांचा विचार राजकीय व्यवस्थेला प्रेरणादायी ठरू दे – Raj Thackeray

२६ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन असतो. या दिवसाच्या निमित्ताने सर्व राजकीय विश्वातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले आहे. अनेक राजकीय नेत्यांपैकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले अभिवादन सध्या चर्चेचा विषय बनले आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन केले आहे. राजकीय भूमी पादाक्रांत करण्याच्या अट्टाहासाच्या काळात सावरकरांचा हा विचार एकूण राजकीय व्यवस्थेला प्रेरणादायी ठरू दे, अशी इच्छा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा आज स्मृतिदिन. सावरकरांचं स्मरण करताना त्यांच्या राष्ट्रवादाच्या चिंतनाबद्दल बोललं जातं पण त्यांच्या सामाजिक चिंतनाबद्दल फारसं बोललं जात नाही. पतितपावन मंदिराच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक क्रांतीचा वस्तुपाठच घालून दिला असं म्हणता येईल. सावरकर नेहमी म्हणत की, “माझी अशी इच्छा आहे की, मी सागरात उडी घेतली होती, ही गोष्ट लोक विसरले तरी चालतील, पण मी जे सामाजिक विचार मांडले आहेत त्यांचे समाजाने स्मरण ठेवावे,’ त्याच सावरकरांनी १९५५ साली पतितपावन मंदिराच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात एक भाषण केलं होतं, त्यात ते असं म्हणाले होते की, “राजकारण तलवारीसारखे असेल तर समाजकारण ढालीसारखे असते. तलवारीच्या आधाराने नवीन भूमी पादाक्रांत करायची आणि समाजकारणाच्या आधारे पायाखाली प्राप्त झालेली भूमी पायाखालीच राहील याची दक्षता घ्यायची.” फक्त राजकीय भूमी पादाक्रांत करण्याच्या अट्टाहासाच्या काळात सावरकरांचा हा विचार एकूण राजकीय व्यवस्थेला प्रेरणादायी ठरू दे हीच इच्छा. सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

Latest Posts

Don't Miss